राज्य ज्यूदो अजिंक्यपद स्पर्धा : पुणे सांघिक विजेता; ठाणे उपविजेता

राज्य ज्यूदो अजिंक्यपद स्पर्धा : पुणे सांघिक विजेता; ठाणे उपविजेता

नाशिक। प्रतिनिधी Nashik

पुनित बालन ग्रुप (Punit Balan Group)यांच्या सहयोगाने आणि महाराष्ट्र ज्यूदो असोसिएशन (Maharashtra Judo Association)आणि नाशिक जिल्हा ज्यूदो असोसिएशन (Nashik District Judo Association)आयोजित 49 व्या महाराष्ट्र राज्य ज्यूदो अजिंक्यपद स्पर्धेमध्ये पीडीजेए पुणे संघाने तीन सुवर्ण, एक रौप्य आणि चार कांस्यपदकांसह चार अधिक गुण घेतल्यामुळे सांघिक विजेतेपदाचा दावेदार ठरला. तर ठाणे संघाने दोन सुवर्ण, एक रौप्य आणि तीन कांस्यपदके मिळवून द्वितीय स्थान मिळवले.

पुरुषांच्या 66 किलो गटामध्ये नाशिकच्या अजिंक्य वैद्यने कोल्हापूरच्या अनमोल पालकरला सोदेत्सुरीकोमीगोषी या डावाचे फसवे आक्रमण दाखवत अनमोलला मॅटवर लोळवले आणि होल्डमधील केसा गातामे डावाचा वापर करत मॅटवर वीस सेकंदे जखडून ठेवत सुवर्ण पटकावले. राज्य स्पर्धेतील हे अजिंक्यचे चौथे सुवर्णपदक असून त्याने सातत्य राखत आपले राज्यातील अव्वल स्थान अबाधित ठेवले आहे.

पुरुषांच्या 81 किलो गटात अहमनगरच्या आदित्य धोपावकरने अंतिम लढतीत सोलापूरच्या प्रदीप गायकवाडला होल्डमधील केसा गातामे डावाचा वापर करत वीस सेकंदे जखडून ठेवत सुवर्ण पटकावले. नगरच्या आदित्यचे राज्य स्पर्धेतील हे एकोणीसावे सुवर्णपदक असून बालगटापासून खेळलेल्या प्रत्येक स्पर्धेत त्याने सुवर्णपदकाची परंपरा कायम राखली आहे. महिलांच्या 48 किलो गटात सातार्‍याची अंतरराष्ट्रीय ज्यूदोपटू रोहिणी मोहितेने अंतिम लढतीत राज्याची आंतरराष्ट्रीय खेळाडू शायना देशपांडेला को-ऊची माकेकोमी डावाने आक्रमण करून वाझाआरी गुण घेतला आणि विजय संपादन केला.

या स्पर्धेमध्ये सर्वसाधारण विजेतेपद पटकावणार्‍या पुणे जिल्ह्याच्या संघाला महाराष्ट्र ज्यूदो संघटनेचे तांत्रिक समिती सचिव दत्ता आफळे यांच्या हस्ते मानाचा विजेता चषक प्रदान करण्यात आला. तर उपविजेता ठाणे संघाला नाशिकचे ज्येष्ठ क्रीडा संघटक आणि ज्यूदो संघटनेचे सचिव डॉ रत्नाकर पटवर्धन यांच्या हस्ते चषक प्रदान करण्यात आला. यावेळी डॉ. सतीश पहाडे, रवी मेतकर, विजय पाटील, रवी पाटील, अर्चना पहाडे आदी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com