
मुंबई | प्रतिनिधी Mumbai
कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल महाविकास आघाडीसाठी सकारात्मक असून आतापासूनच लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागा, अशा सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दिल्या.
पुढील वर्षी लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक होत आहे, या निवडणुकीला जेमतेम ९ ते १० महिने शिल्लक आहेत. या पार्श्वभूमीवर पवार यांनी आज पक्षाच्या निवडक पदाधिकाऱ्यांची यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये बैठक घेतली.
या बैठकीत स्वतः पवार यांनी नाशिक, दिंडोरी, अहमदनगर, दक्षिण नगर, कोल्हापूर, माढा, सातारा, परभणी, बीड, आणि उस्मानाबाद या लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. मागील लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव का झाला, याबाबत त्यांनी पक्षातील पदाधिकारी, विद्यमान आमदार आणि माजी आमदारांकडून मते जाणून घेतली.
मागील निवडणुकीत काँग्रेससोबत युती होती. आता महाविकास आघाडीच्या माध्यमातून ठाकरे गट सोबत राहणार असल्यामुळे राज्यात आपल्यासाठी चित्र सकारात्मक असेल, असा दावा करत पवार यांनी पदाधिकाऱ्यांशी बोलताना केला. लोकसभेची ही निवडणूक राष्ट्रवादीसाठी महत्त्वाची आहे. त्यामुळे आतापासूनच कामाला लागा, असे निर्देशही पवार यांनी दिले. दरम्यान, आज बुधवारी जळगाव, रावेर, कल्याण, ठाणे, ईशान्य मुंबई, भंडारा, बुलढाणा, रायगड, मावळ आणि बारामती लोकसभा मतदार संघाचा आढावा घेण्यात येणार आहेत.
दक्षिण नगरची चर्चा
आगामी लोकसभा निवडणुकीत दक्षिण नगरचे खासदार सुजय विखे पाटील यांना अस्मान दाखविण्याचा चंग राष्ट्रवादीने बांधला आहे. त्यादृष्टीने शरद पवार यांनी आज बैठकीत दक्षिण नगरची सध्याची राजकीय स्थिती जाणून घेतली. दक्षिण नगरच्या संभाव्य उमेदावराच्या नावावर बैठकीत कोणतीही चर्चा झाली नाही. मात्र, उमेदवार हा सर्वसामान्य जनतेशी नाळ जोडलेला आणि चांगल्या प्रतिमेचा असावा, अशी चर्चा बैठकीत झाल्याचे समजते.