सीहोरच्या रुद्राक्ष महोत्सवात चेंगराचेंगरी

एका महिलेचा मृत्यू; तीन बेपत्ता , पंडित प्रदीप मिश्रांविरोधात नाराजी,मोबाईल नेटवर्कवरही ताण
 सीहोरच्या रुद्राक्ष महोत्सवात चेंगराचेंगरी

सीहोर । Sehore

मध्य प्रदेशातील सीहोर (Sehore's)येथे आयोजीत करण्यात आलेल्या शिवमहाकथापुराण महोत्सवाला प्रचंड गर्दी झाली असन रुद्राक्ष महोत्सवाच्या (Rudraksh festival) पहिल्या दिवशी स्थिती नियंत्रणाबाहेर गेली. रुद्राक्ष घेण्याच्या नादात चेंगराचेंगरी (Stampede) झाल्याने मालेगावच्या एका महिलेचा मृत्यू झाला. तर बुलढाणा जिल्ह्यातील 3 महिला बेपत्ता झाल्या आहे.त्यामुळे सीहोरला जाणार्‍या भाविकांनी योग्य ते नियोजन करुनच घराबाहेर पडावे असे आवाहन मध्य प्रदेश प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

सीहोरला रुद्राक्ष महोत्सात प्रचंड गर्दी झाल्याने अनेकांना रुद्राक्ष न मिळाल्याने लोकांनी पंडित प्रदीप मिश्रांविरोधात नाराजी व्यक्त करत घोषणा दिल्या. येथे जवळपास 20 लाख लोक जमल्याचा अंदाज आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही आपला येथील प्रस्तावित दौरा रद्द केला

या कार्यक्रमासाठी आलेल्या महाराष्ट्रातील मालेगाव येथील मंगला बाई नामक महिलेची प्रकृती अचानक बिघडली होती. ती चक्कर येऊन खाली पडली. त्यातच तिचा मृत्यू झाला. तर बुलढाण्याच्या एका महिलेसह 3 महिला भाविक बेपत्ता झाल्या आहेत.

बुधवारी दीड लाख रुद्राक्ष वाटले

भाविकांची मोठी गर्दी पाहून पंडित प्रदीप मिश्रा यांनी बुधवारी रुद्राक्षांचे वितरण सुरु केले होते. समितीने 20 काउंटर्सच्या मदतीने भाविकांना रुद्राक्ष वाटले. बुधवारी सायंकाळपर्यंत जवळपास दीड लाख रुद्राक्षांचे वाटप झाले.

विविध राज्यांतून येत आहेत भक्त

या महोत्सवाला मध्य प्रदेश व महाराष्ट्रासह, हरियाणा, राजस्थान, दिल्ली, गुजरात आदी देशाच्या विविध राज्यातून भाविक येत आहेत. बुधवारी कुबेरेश्वर धाम महादेवाच्या दर्शनासाठी 2 किमी लांब रांग लागली होती.

रुद्राक्षाच्या मोहापायी येवू नका!

पंडित प्रदीप मिश्रा म्हणाले की, येथे रुद्राक्षाच्या लोभापायी कुणीही येऊ नये. तिकीट रद्द करा. येथे यायचे असेल तर महादेवांसाठी या. रुद्राक्षासाठी येण्याची काहीच गरज नाही. गुरुवारी सकाळची कुबेरेश्वर धाम ते इछावर रोडपर्यंत 17 किमी लांबीचा जाम होता. सीहोर ते इंदूरच्या दिशेने 27 किमी व भोपाळच्या दिशेने 10 किमी लांबीच्या महामार्गावरही जाम होता. गर्दीमुळे मोबाईल नेटवर्कवरही ताण आला होता. पोलिस व प्रशासनाच्या टीम व्यतिरिक्त आरएसएस, बजरंग दल, स्थानिक लोक, समिती सदस्य असे एकूण 15,000 लोक व्यवस्था सांभाळत आहेत. कथा पंडाल, अन्न पंडाल, रुद्राक्ष वितरण केंद्र येथे त्यांची ड्युटी लावण्यात आली आहे.

मरण कुणाला चुकले?-पं.प्रदीप मिश्रा

दुसरीकडे, कथा सांगताना पंडित प्रदीप मिश्रा म्हणाले - लोक मृत्यूला विनाकारण घाबरतात. केदारनाथाला जात नाहीत. कारण, तिथे खूप थंडी आहे. काही झाले तर काय करणार असे त्यांना वाटते. पण लक्षात घ्या मृत्यू येणार असेल तर येणारच. मग तुम्ही घरात लपले तरी काही होणार नाही. तुम्ही घरात असाल आणि पाय पुसण्यासाठी पाय पायपुसणीवर ठेवला असेल, तर तुम्ही पाय घसरून पडणारच. तुम्ही 7 कुलूप लावून का बसेना, मृत्यू येणार असेल तर टळणार नाही. तो येणारच.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com