रखडलेले प्रकल्प : इलेक्ट्रिक टेस्टिंग लॅबची कासवगती

3 वर्षांत पूर्ण होणारा प्रकल्प 8 वर्षांनंतरही अपूर्णच
रखडलेले प्रकल्प : इलेक्ट्रिक टेस्टिंग लॅबची कासवगती

नाशिक । नरेंद्र जोशी Nashik

नाशिकच्या इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रिकल उद्योगासह शिलापूरसाठी ( Shilapur ) वरदान ठरणारा इलेक्ट्रिकल टेस्टिंग लॅबच्या ( Electrical Testing Lab project) घोषणेला आता 8 वर्षे झाली. बांधकामाचा श्रीगणेशा होऊन दोन वर्षे पूर्ण झाली. कधी करोना तर कधी विरोधी पक्षात यामुळे प्रकल्प पूर्ण होण्यासाठी अजून एखादा वर्ष तरी प्रतीक्षेशिवाय पर्याय राहिलेला नाही.

शिलापूरचा प्रकल्प लवकरच होणार, असे प्रत्येक निवडणुकीत सांगितले जाते. मात्र, तो लवकर दिवस कधी उजाडणार हे एकाही ज्योतिषाला अजून सांगता आलेले नाही. प्रकल्पाकरता पहिल्या टप्प्यात शंभर कोटी रुपये मंजूर आहेत. प्रथमत: अत्यावश्यक असलेल्या संरक्षण भिंतीच्या अनुषंगाने कामे पूर्ण झाली आहेत. पुढील तीन वर्षांत प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट पूर्वीच सीटीआरआयने ठेवले होते. त्याबाबत संबंधितांंना विचारले असता प्रकल्पाचे बहुतांशी काम पूर्ण झाले आहे. या वर्षअखेरीस हा प्रकल्प कार्यान्वित होईल, असे सांगण्यात आले.

नाशिक हे इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रिकल उद्योगांचे हब म्हणून देशाच्या नकाशावर प्रसिद्ध आहे. देशातील 80 टक्के स्विच गियर्स आणि ब्रेकर्सचे उत्पादन एकट्या नाशिकमध्ये होते. मात्र, येथील उद्योगांना आपली उत्पादने तपासणीसाठी बंगलोर, भोपाळ येथे पाठवावी लागतात. हे काम वेळखाऊ आणि खर्चिक आहे. त्यामुळे ही उत्पादने तपासणारी मानांकन देणारी लॅब (तपासणी प्रयोगशाळा) नाशिकमध्ये व्हावी याकरता सातत्याने उद्योजकांकडून मागणी केली जात होती.

माजी खासदार समीर भुजबळ यांनी तो प्रकल्प नाशिकला आणला. त्यानंंतर त्यावर कळस चढवण्याचे काम खा. हेमंत गोडसे यांनी निश्चित केले. मात्र दोन वर्षे करोना, त्यानंंतर खा. महाविकास आघाडीत असल्याने गती मंदावली. आता मात्र खा. गोडसे यांनी काळाची पावले ओळखून मोदी सरकारशी जवळीक साधल्याने रखडलेले हे प्रकल्प लवकरच मार्गी लागण्याची आशा बळावली आहे.

नाशिक-औरंगाबाद रस्त्यावरील शिलापूर गावठाणाची शंभर एकर जागा या प्रकल्पासाठी हस्तांतरित करण्यात आली आहे. एचएएल, सिक्युरिटी प्रेस यानंतर प्रदीर्घ काळानंतर केंद्र सरकारचा येणारा हा प्रकल्प असल्याने तो नाशिकच्या उद्योगांसाठी लाभदायी ठरणार आहे. शिलापूरचा चेहरामोहरा बदलण्यास मदतच होणार आहे.

हजारो तरुणांना रोजगारही उपलब्ध होणार आहे. हा प्रकल्प व्हावा अशी अनेक वर्षांची येथील इलेक्ट्रिकल उत्पादकांची इच्छा आहे. कारण केवळ उत्पादनांचा दर्जा निश्चित करून ते प्रमाणपत्र मिळवण्यासाठी भोपाळ व बंगळुरूला जावे लागते. त्यांचा वेळ व पैसा वाचावा, उत्तर महाराष्ट्रातील उद्योजकांची सोय व्हावी, अनेकांना रोजगार मिळावा, हे मोठे स्वप्न पाहून या प्रकल्पाची उभारणी करण्याचा निर्णय झाला. आता तरी 2024 च्या आत तो पूर्ण व्हावा, अशीच सर्वांची इच्छा आहे.

प्रकल्पाची घोषणा 8 वर्षांपूूर्वी

प्रकल्पाचा कालावधी 3 वर्षांचा

करोना व राजकीय

वादामुळे 2 वर्षे काम ठप्प

सद्यस्थितीत 90 टक्के काम पूर्ण

या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या संरक्षक भिंतीचे काम पूर्ण झाले आहे. जवळजवळ 90 टक्के काम पूर्ण होत आले आहे. पहिल्या टप्प्यात शंभर कोटी रुपये मंजूर असून हा प्रकल्प उद्योगांसह परिसरातील नागरिकांनाही प्रचंड लाभदायी ठरणार आहे. यामुळे नाशिकमध्ये इलेक्ट्रिकल क्लस्टर साकारण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

हेमंत गोडसे, खासदार ( MP Hemant Godse )

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com