Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्र'असा' लागणार दहावीचा निकाल!, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची मोठी घोषणा

‘असा’ लागणार दहावीचा निकाल!, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची मोठी घोषणा

मुंबई | Mumbai

करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे दहावीची बोर्ड परीक्षा राज्य सरकारने रद्द केली होती. १० वी ची रद्द केल्यानंतर निकालावरुन सावाळा गोंधळ उडाला होता. पालक, विद्यार्थी यांच्यातही संभ्रम निर्माण झाला होता. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज पत्रकारपरिषद घेत इयत्ता दहावी मूल्यमापन प्रक्रिया व इयत्ता अकरावी प्रवेशाबाबत सवस्तिर माहिती दिली.

- Advertisement -

दहावीची परीक्षा : निकालाबाबत समाधानी नसल्यास काय करता येईल ?

दहावीच्या निकालासाठी १०० टक्के गुणांपैकी ५० टक्के गुणांचे वेटेज दहावीच्या अंतर्गत मूल्यमापनावर तर ५० टक्के गुणांचे वेटेज नववीच्या अंतिम परीक्षेच्या गुणांना देऊन विद्यार्थ्यांचे मूल्यमापन केले जाणार आहे. विद्यार्थ्यांचे प्रत्येक विषयाचे १०० गुणांचे मूल्यमापन करण्यात येईल. दहावीत अंतर्गत मूल्यमापनासाठी ३० गुण, प्रात्यक्षिकसाठी २० गुण आणि नववीत मिळवलेल्या गुणांसाठी ५० गुणांचे वेटेज अशा पद्धतीने मूल्यमापन करून दहावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबतची घोषणा केली.

विद्यार्थ्यांच्या निकालाचे नियमन करण्यासाठी शाळा स्तरावर मुख्याध्यापकाच्या अध्यक्षेतेखाली 7 सदस्यीय निकाल समिती असेल. ही निकालाची पडताळणी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडून करण्यात येईल. तसेच शाळा स्तरावर काही गैरप्रकार झाल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल. मंडळामार्फत जून अखेर निकाल घोषित करण्याचा मानस आहे. यासाठी मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वेळापत्रक मंडळाकडून लवकरच जाहीर करण्यात येईल. शाळांचा याचं तंतोतंत पालन करावं लागेल, असं शिक्षणमंत्री म्हणाल्या..

अकरावी प्रवेशाची प्रक्रिया कशी असणार?

इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांना इयत्ता ११ वीच्या प्रवेशासाठी CET द्यावी लागणार आहे. विविध परीक्षा मंडळांनी या वर्षीच्या इयत्ता १० वी निकालासाठी शाळा स्तरावर होणारे अंतर्ग मूल्यमापन विचारात घेतल्याने इयत्ता ११ वी प्रवेशासाठी एकवाक्यता राहण्याच्या दृष्टीने व सर्व विद्यार्थ्यांना समान संधी मिळावी यासाठी ११ वी प्रवेशासाठी वैकल्पिक (Optional) CET परीक्षे घेण्यात येणार आहे. CET परीक्षेत १० वीच्या अभ्यासक्रमाच्या आधारेच घेण्यात येणार आहे. परीक्षा १०० गुणांची असणार असून त्यासाठी बहुपर्यायी प्रश्न असणार आहेत व ओएमआर पद्धतीनं दोन तासांची परीक्षा घेण्यात येणार आहे.

इयत्ता ११ वी प्रवेश परीक्षा राबविताना CET दिलेल्या विद्यार्थ्यांना सामाईक प्रवेश परीक्षेतील CET गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्राधान्य देण्यात येणार आहे. सामाईक परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशानंतर, कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये रिक्त जागा ज्या विद्यार्थ्यांनी सामाईक परीक्षा दिली नाही अशा विद्यार्थ्यांसाठी खुल्या असतील व त्या जागांवर सामाईक परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता १० वीच्या मूल्यमापन पद्धतीनुसार मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या