श्रीलंका आशिया चषकाचा मानकरी

श्रीलंका आशिया चषकाचा मानकरी

दुबई । प्रतिनिधी UAE

आशिया चषकाचा अंतिम सामना श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात चुरशीचा होवून श्रीलंकेच्या 171 धावांच्या डोंगराएवढा लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तान 147 धावांवर गारद झाल्याने श्रीलंकेचा 23 धावांनी विजय झाला. श्रीलंकेने पाकिस्तानच्या आशा धुळीस मिळवत आशिया चषकावर आपले नाव दिमाखात कोरले.

श्रीलंकेच्या प्रमोद मदुशनने सर्वाधिक 4 तर वनिंदु हसरंगा 3 तर चमिका करुणारत्ना 2 आणि महीश थीक्षना 1 बळी घेतला. पाकिस्तानकडून मोहम्मद रिजवानने एकाकी झुंज दिली, मात्र तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. त्याने 49 चेंडूत 4 चौकार आणि 1 षटकारासह 55 धावांची खेळी केली. त्याला अष्टपैलू वनिंदु हसरंगाने बाद करत विजय जवळ आणला. श्रीलंकेकडून प्रमोद मदुुशन आणि वनिंदु हसरंगा यांनी पाकला एकामागून एक धक्के दिले.

पाकला मधुशंकाकडून पहिलाच चेंडू नो बॉल मिळाला. त्यानंतर पाकिस्तानच्या शून्य चेंडूवर 9 धावा झाल्या. तिसर्‍या षटकाच्या दुसर्‍या चेंडूवर पाकिस्तानला पहिला धक्का प्रमोद मधुशनच्या चेंडूवर कर्णधार बाबर आझम 5 धावांवर झेलबाद झाला. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर मधुशनने फखर जमानला शून्यावर त्रिफळाचित केले. दुसरीकडे मोहम्मद रिजवानने संयमी खेळी सुरू ठेवली. त्याच्या सोबत इफ्तिखार अहमद मैदानावर होता.

पाकने 7 व्या षटकात अर्धशतकी धावसंख्या उभारली. पाकिस्तानच्या मोहम्मद रिजवान आणि इफ्तिखार अहमद यांची जोडी फोडण्यात श्रीलंकेला 14 व्या षटकाच्या दुसर्‍या चेंडूवर यश मिळाले. प्रमोद मदुशनच्या गोलंदाजीवर इफ्तिखार अहमदच्या बॅटला कट लागून चेंडू उंच हवेत गेला आणि तो झेलबाद झाला. त्याने 31 चेंडूत 2 चौकार आणि 1 षटकारासह 32 धावा केल्या. यानंतर मात्र पाकिस्तानचा संघ दबावात आला. त्यानंतर मैदानावर मोहम्मद नवाज आला.

मात्र, तो देखील 6 धावांवर माघारी फिरला. खुशदिल शाह (2) आसिफ अली (0), शादाब खान (8), नसीम शाह (4), हारिस रऊफ (13), मोहम्मद हसनैन (*8)

तत्पूर्वी पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित षटकात 6 बाद 170 धावांचा डोंगर उभा केला. श्रीलंकेच्या या डावाला आकार देण्याचे काम आयपीएल गाजवणार्‍या भानुका राजपक्षेने केले.

त्याआधी पाकिस्तानच्या नसीम खानने कुशल मेंडिसला पहिल्याच चेंडूवर भोपळाही न फोडता तंबूत पाठवले. त्यानंतर पथुम निसंकाने 8 धावा करून झेलबाद झाला. त्यानंतर दनुष्का गुनातिलका देखील अवघ्या धावेवर माघारी फिरला. धनंजय डिसिल्वाने संयमी खेळी करत 21 चेंडूत 4 चौकारासह 28 धावांवर इफ्तिखार अहमदने त्याला झेलबाद केले. दसून शानका (2) वनिंदु हसरंगाने मात्र फटकेबाजी करत 21 चेंडूत 5 चौकार आणि 1 षटकारासह 36 धावांची खेळी करत संघाची धावसंख्या वाढविली. त्याला शादाब खानने झेलबाद केले. हॅरिस रौफने श्रीलंकेला एकामागून एक धक्के दिले.

पाचव्या क्रमांकावर खेळायला आलेल्या राजपक्षेने खणखणीत अर्धशतक झळकावून श्रीलंकेला मोठ्या धावसंख्येच्या दिशेने नेले. 5 बाद 58 अशी स्थिती असताना राजपक्षेने आधी हसरंगा आणि करुणारत्नेहसह अर्धशतकी भागीदार्‍या केल्या. त्याने 45 चेंडूत 6 चौकार आणि 3 षटकारांसह नाबाद 71 धावा फटकावल्या. त्याने हसरंगासह 58 तर करुणारत्नेसह 54 धावांची भागीदारी साकारली. त्यामुळे श्रीलंकेला 6 बाद 170 धावा स्कोअरबोर्डवर लावता आल्या. रौफने चार षटकात 29 धावांच्या बदल्यात 3 बळी घेतले. तर नसीम शाह, शादाब खान आणि इफ्तिकारने प्रत्येकी एक बळी घेतला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com