नाशिक । प्रतिनिधी Nashik

करोना विषाणू मध्ये झालेल्या जनुकीय बदलाच्या पार्श्वभूमीवर विशेष सर्वेक्षण नाशिक महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येणार असून दि.२५ नोव्हेंबर नंतर इंग्लंडहून भारतात आलेल्या नागरिकांनी नाशिक महानगरपालिकेच्या आरोग्य वैद्यकीय विभागात संपर्क करण्याचे आवाहन आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.बापूसाहेब नागरगोजे यांनी केले आहे.

करोना विषाणू मध्ये झालेल्या जनुकीय बदलाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार विशेष सर्वेक्षण करणे बाबत सूचित केलेले आहे. त्या अनुषंगाने नाशिक महानगरपालिकेच्या वतीने विशेष सर्वेक्षण करण्यात येणार असून राज्यात २५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर २०२० या काळात इंग्लंडहून आलेल्या प्रवाशांचे विशेष सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

जे प्रवासी भारतात येऊन २८ दिवसांपेक्षा अधिक काळ झालेला आहे ते वगळून इतर प्रत्येकाची आर टी पी सी आर चाचणी करण्याच्या सूचना दिल्या असून त्या अनुषंगाने नाशिक महानगरपालिकेच्या वतीने नियोजन करण्यात आलेले आहे.मनपाच्या वतीने सुरू असलेल्या सर्वेक्षण अंतर्गत नाशिक शहरात २५ नोव्हेंबर २०२० नंतर इंग्लंडहून भारतात आलेले आहेत त्यांचा शोध घेणे सुरू आहे.

मात्र जे कुणी मनपा हद्दीत आलेले असतील त्यांनी स्वतःहून नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागात संपर्क साधून या विशेष सर्वेक्षणास सहकार्य करावे असे आवाहन मनपा आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी केले आहे.