Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याआजपासून नाशकात विशेष अतिक्रमण मोहीम

आजपासून नाशकात विशेष अतिक्रमण मोहीम

नाशिक । प्रतिनिधी Nashik

न्यायालयाच्या आदेशानुसार 30 सप्टेंबरपर्यंत रहिवासी अतिक्रमण काढता येत नव्हते, मात्र आता ऑक्टोबर महिना सुरू झाला असून महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने (Encroachment Department)शहरात विशेष अतिक्रमण मोहीम राबवून नाशिक शहर अतिक्रमणमुक्त करावे, गरज पडली तर विशेष पोलीस बंदोबस्त घेऊन कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त तथा प्रशासन डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार (Dr. Chandrakant Pulkundwar)यांनी दिले.

- Advertisement -

नाशिक महापालिकेचा अतिक्रमण विभाग हा मागील काही महिन्यांपासून अत्यंत शांत आहे. शहरात मोठ्या प्रमाणात वाढलेल्या अतिक्रमणाकडे देखील या विभागाचे लक्ष नाही. त्यामुळे लोकप्रतिनिधींसह नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात तक्रारी देखील प्राप्त झाल्या आहेत. यामुळे महापालिका आयुक्तांनी आज अतिक्रमण विभागाला रडारवर घेतले.

नाशिक शहरातील सर्व सहा विभागात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले असून ऑनलाइन, ऑफलाइन पद्धतीने प्रशासनाकडे शेकडो तक्रारी प्राप्त झाल्या तरी अतिक्रमण विभाग पाहिजे त्या प्रमाणात कारवाई करीत नसल्यामुळे आयुक्तांनी अतिक्रमण विभागावर नाराजी व्यक्त करीत येत्या सोमवारपासून तत्काळ अतिक्रमण निर्मूलन मोहीम हाती घेण्याचे आदेश दिले. अतिक्रमण मोहीम लागण्यासाठी महापालिकेकडे यापूर्वीच एकूण 14 पोलीस जवानांचा बंदोबस्त आहे तर विशेष अतिक्रमण मोहीम राबविण्यासाठी अधिक पोलीस बंदोबस्त घेण्याची गरज पडली तर ते तत्काळ घेण्याचा आदेश देखील त्यांनी दिला आहे.

अतिक्रमणामुळे नाशिक शहराला बकाल स्वरूप येत आहे. एकीकडे सुंदर नाशिक स्वच्छ नाशिक असे सांगितले जात असले तरी शहरातील मुख्य रस्त्यांसह अनेक भागात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. शहरातील शालिमार, शिवाजीरोड, मेनरोड आदी काही भागात तर पायी चालायला देखील जागा मिळत नाही. अनेक वेळा याबाबत तक्रारी करूनही प्रशासनाने त्याची दखल घेतली नव्हती. मात्र आयुक्तांनी आज अतिक्रमण विभागाला कडक सूचना केल्यामुळे आज सोमवारपासून विशेष अतिक्रमण म्हणून सुरू होणार आहे.

पंचवटीतील ‘ते’ अतिक्रमण हटणार

महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आज महापालिकेत आढावा बैठक घेऊन अतिक्रमण मोहीम जोमाने सुरू करण्याचे आदेश दिले. दरम्यान पंचवटी विभागातील एका माजी नगरसेवकाच्या बांधकामाचे देखील अतिक्रमण काढण्याचे आदेश त्यांनी दिल्याचे समजते. नदीला लागून असलेल्या जागेत एका माजी नगरसेवकाचे बांधकाम असल्याची माहिती मिळाली असून अनेक वेळा सूचना करूनही ते अतिक्रमण काढण्यात आले नसल्यामुळे आता आयुक्तांच्या आदेशानंतर ते अतिक्रमण देखील हटणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या