
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
महापालिकेच्या पंचवटी विभागीय कार्यालयाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत ’स्वच्छ सर्वेक्षण 2023’ अंतर्गत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी नदी काठावर जंतुनाशक फवारणी करण्यासह तब्बल 400 किलो कचरा संकलित करण्यात आला...
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या आदेशाने घनकचरा व्यवस्थापन विभाग संचालक डॉ. कल्पना कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचवटी विभागीय अधिकारी नरेंद्र शिंदे, विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय दराडे आदींच्या उपस्थितीत पंचवटीमधील कन्नमवार पुल ते लक्ष्मीनारायण मंदिरापर्यंत गोदावरी नदी पात्रालगत विशेष स्वच्छता मोहीम घेण्यात आली.
या मोहीमेत 400 किलो प्लास्टिक आणि तत्सम कचरा गोळा करून घंटागाडीमार्फत उचलून घेण्यात आला. तसेच मलेरिया विभागामार्फत नदी पात्रातील पाणवेलीही काढण्यात येवून नदी परिसरात जंतुनाशक फवारणी करण्यात आली.
स्वामी नारायण मंदिरासमोर व्यवसाय करणार्यांना आणि पात्रालगत राहणार्या नागरिकांना नदी पात्रात कचरा न टाकता विलगीकरण करुन घंटागाडीत देण्याबाबत व प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी न वापराबाबत यावेळी जनजागृती करण्यात आली.
ही विशेष स्वच्छता मोहिमेत स्वच्छता निरीक्षक उदय वसावे, दीपक चव्हाण, मुकादम नंदू गवळी, किशोर साळवे, अनिल नेटावटे, वॉटरग्रेस प्रोड्क्टसचे विलास नाईकवाडे, कृष्णा शिंदे, 45 स्वच्छता कर्मचारी तसेच मलेरिया विभागाचे कैलास पांगारकर आणि इतर कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.