मतदार ओळखपत्र आधार जोडणीसाठी विशेष मोहीम

निवडणूक शाखा आता महाविद्यालयात
मतदार ओळखपत्र आधार जोडणीसाठी विशेष मोहीम

नाशिक । वैभव कातकाडे Nashik

रविवारी घेतलेल्या विशेष मोहिमेमध्ये शहर वगळता मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाल्यानंतर आता निवडणूक विभागाने जनजागृतीसाठी पुढचे पाऊल उचलले आहे. यामध्ये महाविद्यालये तसेच राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय कॅडेट कॉर्पस म्हणजेच एनएसएस, एनसीसी यांच्या प्रमुखांची मदत घेतली जाणार असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्वाती थविल यांनी दिली आहे.

निवडणूक शाखेने जिल्ह्यातील 15 ही विधानसभा मतदारसंघात मतदार कार्ड हे आधारला जोडण्यासाठी (link voter card to Aadhaarविशेष मोहीम राबविली. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील 80 हजार 55 मतदारांचे मतदान कार्ड हे आधारशी सिंडींग करण्यात आले. सर्वाधिक प्रमाण हे बागलाणमध्ये असले तरीदेखील शहरात मात्र अल्प प्रतिसाद बघायला मिळाला आहे. परिणामी सोमवारी रात्री देखील नाशिक मध्य या मतदारसंघाचे लिंकिंग सुरू होते.

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार जिल्ह्यात आधारला मतदार कार्ड जोडण्याची मोहीम राबविली जात आहे. त्याअंतर्गत जिल्हा निवडणूक शाखेने तब्बल 4 हजार 681 मतदान केंद्रांवर एकाच वेळी विशेष मोहीम घेतली. या मोहिमेत बीएलओंमार्फत (बूथ लेव्हल अधिकारी) आधार सिडींगसाठी मतदारांकडून नमुना अर्ज क्रमांक 6 भरून घेण्यात आले. या विशेष मोहिमेला मतदारांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. तब्बल 80 हजार 55 मतदारांचे मतदान कार्ड हे आधारशी संलग्न करण्यात आले. त्यातही नाशिक शहरातील तीन्ही विधानसभा मतदारसंघापेक्षा ग्रामीण भागातील मतदारांचा या मोहिमेला चांगला प्रतिसाद लाभला.

विशेष मोहिमेत आधार सिडींग

नांदगाव 7428, मालेगाव मध्य 4274, मालेगाव बाह्य 2266, बागलाण 12137, कळवण 4968, चांदवड 6087, येवला 8489, सिन्नर 3674, निफाड 6314, दिंडोरी 6234, नाशिक पूर्व 2731, नाशिक मध्य 3073, नाशिक पश्चिम 3353, देवळाली 5171, इगतपूरी 3856. एकूण 80055.

1 ऑगस्टपासून मतदान कार्डला आधार लिंक करण्याची मोहीम सुरू झाली आहे. रविवारी ऐंशी हजार लिंक करण्यात आले. आतापर्यंत 8 लाख 80 हजार एवढे कार्ड लिंक झाले आहेत. आता महाविद्यालय स्तरावर जनजागृती करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. त्यासाठी एनसीसी, एनएसएस यांच्या प्रमुखांची मदत घेतलीं जाणार आहे.

स्वाती थविल,उपजिल्हा निवडणूक अधिकारी

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com