Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्याउमेदवारांना खर्च सादर करण्यासाठी निवडणूक आयोगाचे विशेष अ‍ॅप

उमेदवारांना खर्च सादर करण्यासाठी निवडणूक आयोगाचे विशेष अ‍ॅप

नाशिक । प्रतिनिधी Nashik

करोनाच्या निर्बंधातच आगामी नाशिक महानगरपालिकेची पंचवार्षिक निवडणूक( NMC Elections ) होणार आहे. निवडणूक आयोगाने ( Election Commission )यापूर्वीच अनेक प्रकारचे कडक निर्बंध प्रचार तसेच मतदानासाठी लावले आहेत. त्याचप्रमाणे निवडणूक प्रक्रियेचे आधुनिकीकरण देखील करण्यात आले आहे.

- Advertisement -

यामुळे आता उमेदवारांना प्रचारादरम्यान होणारा खर्च प्रशासनाला सादर करण्यासाठी स्वतंत्र अ‍ॅपची निर्मिती ( separate app to present the expenses )आयोगाच्या वतीने होणार आहे. त्यामुळे निवडणूक खर्च उमेदवारांना ऑनलाईन जमा करता येणार आहे.

निवडणुकीच्या वेळी उमेदवारी दाखल झाल्यानंतर प्रत्येक उमेदवाराला निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे कार्यकर्त्यांवर तसेच इतर प्रचारासाठी होणारा खर्च प्रशासनाला दुसर्‍या दिवशी दुपारी दोन वाजेपर्यंत सादर करणे बंधनकारक राहते. वेळेत खर्च सादर न करणार्‍या उमेदवारांना प्रशासनाच्या वतीने अनेक वेळा नोटिसा देखील काढण्यात आल्या आहेत.

त्याचप्रमाणे मतदान संपल्यानंतर संपूर्ण निवडणूक प्रक्रियेदरम्यान झालेला एकूण खर्चाचा तपशील देखील एक महिन्याच्या आत प्रशासनास सादर करणे अपेक्षित असते. यामध्ये विजयी उमेदवारासह पराभूत उमेदवारांचादेखील समावेश असतो.ज्या उमेदवारांनी उमेदवारी दाखल करून माघारीच्या दिवशी माघार घेतली तरी त्या कालावधीत त्यांनी केलेला खर्च प्रशासनाला दाखवावाच लागतो.असे न झाल्यास त्याच्यावर सुमारे सहा वर्षापर्यंत अपात्र होण्याची तरतूद देखील कायद्यात आहे.

यामुळे निवडणूक काळात उमेदवारांकडून होणारा खर्च हा बारकाईने प्रशासनाकडे दाखवण्याची प्रक्रिया आहे. मात्र यंदा निवडणूक आयोगाच्या वतीने खर्च दाखवण्यासाठी विशेष मोबाइल अ‍ॅपची निर्मिती करण्यात येणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर याबाबतचे लिंक प्रशासनाच्या वतीने उमेदवारांना मिळणार आहे. तर तो अ‍ॅप उमेदवाराने आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून दिवसभरात होणारा खर्च त्यात टाकायचा आहे, यानंतर संध्याकाळी या संपूर्ण खर्चाच्या तपशिलाची एक प्रिंट काढायची आहे व त्या प्रिंटसह झालेल्या खर्चाचे बिल हे जोडून दुसर्‍या दिवशी दुपारी दोन वाजेपर्यंत प्रशासनाकडे सुपूर्द करावे लागणार आहे.

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर झाल्यास आणखी पारदर्शी पद्धतीने काम होते. आयोगाच्या वतीने उमेदवारांना खर्च दाखवण्यासाठी मोबाईल अ‍ॅप बनविण्यात येणार आहे. यामुळे प्रशासन तसेच उमेदवारांना खर्च सादर करताना व घेताना जास्त त्रास होणार नाही.

कैलास जाधव, महापालिका आयुक्त

- Advertisment -

ताज्या बातम्या