सोनिया गांधीच काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष

सहा महिन्यात नवीन अध्यक्षांची निवड करण्याचा निर्णय
Sonia Gandhi
Sonia Gandhi

नवी दिल्ली -

काँग्रेस कार्यकारी मंडळाची ( congress working committee ) सोमवारी वादळी बैठक झाली. अखेरी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यावर एकमत झाले. त्या पुन्हा एक वर्ष हंगामी अध्यक्ष राहणार आहे. परंतु सहा महिन्यात नवीन अध्यक्षांची निवड करण्याचा निर्णय घेतला गेला.

बैठकीच्या समारोपात बोलताना सोनिया गांधी यांनी पत्रावरून आणि झालेल्या आरोप प्रत्यारोपावरून नाराजी व्यक्त केली. आपण दुखावलो गेलो आहे, पण झाले गेले सोडून द्या. आता पुन्हा नव्याने एकजुटीने कामाला सुरूवात करू, अशा भावना सोनिया गांधी यांनी बैठकीत व्यक्त केल्या.

सोमवारी काँग्रेस कार्यकारी मंडळाची ( congress working committee ) ची बैठक सुरू होताच, अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनी राजीनाम्याचा प्रस्ताव ठेवला. त्यासोबत नवा अध्यक्ष निवडीची प्रक्रीया सुरू करण्याची सुचना केली. मात्र माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सोनिया गांधी यांनीच नेतृत्व करावे, असे सुचवत असंतुष्ट नेत्यांवर निशाणा साधला. ए.के.अँटोनी यांनी राहुल गांधी यांनीच नेतृत्व करावे, असा आग्रह केला. मात्र सर्वाधिक चर्चा झाली ती राहुल गांधी यांच्या नाराजीची. त्यांनी या पत्राच्या वेळेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर काँग्रेसमधील अंतर्गत राजकारणाला वेगळेच वळण लागले आहे. नेते एकमेकांच्या भुमिकांवर प्रश्नचिन्ह लावत असल्याने पक्षात आलबेल नसल्याचे समोर आले. पक्षात काही नेते गांधी परिवाराने नेतृत्व करावे यावर ठाम आहेत. तर काहींनी बदल अपेक्षीत असल्याचे ठामपणे सांगीतल्याचे म्हटले जाते.

राहुल गांधी यांनी पत्रावर प्रश्न उपस्थित करताना यामागे भाजपचे षडयंत्र असावे, असा संशय व्यक्त केल्याने काही नेते नाराज झाले आहेत. गुलाबनबी आझाद यांनी तर थेट पक्षातील पदांपासून मुक्त होण्यास तयार असल्याचे सांगून टाकले.

कपिल सिब्बल यांनीही आपली नाराजी जाहिरपणे ट्विट करून व्यक्त केली. राजस्थान प्रकरणात पक्षासाठी कोर्टात लढलो, याची आठवण करून देत 30 वर्षात भाजपच्या पथ्यावर पडेल, असा एक शब्द आपल्याकडून गेला नाही. तरिही भाजपची संधान साधल्याचा आरोप होतो, याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.

दरम्यान, काही वेळाने सिब्बल यांनी आपले ट्विट हटवले. स्वत: राहुल गांधी यांनी आपण तसे काही म्हटलो नाही असे स्पष्ट केल्याने आधीचे ट्विट हटवत असल्याचे ते म्हणाले.याबाबत रणजित सिंग सुरजेवाला यांनीही ट्विट करून सारवासारव केली. राहुल गांधी यांनी पत्राबाबत केलेले विधान म्हणजे माध्यमांनी लावलेला शोध असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, राहुल गांधी यांनी दाखवलेली आक्रमकता. पक्षात नसलेली एकवाक्यता आणि आरोप-प्रत्यारोप यामुळे काँग्रेसच्या अडचणींत भर पडली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com