Tuesday, April 23, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिक शिवसेनेला खिंडार?

नाशिक शिवसेनेला खिंडार?

नाशिक । फारुक पठाण Nashik

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा नगर विकास मंत्री असलेले एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वात मोठे बंड करीत शिवसेनेतील 40 आमदार घेऊन थेट महाराष्ट्राची सत्ता काबीज केली आहे. भारतीय जनता पक्षाच्या साथीने ते मुख्यमंत्री झाले आहेत. आता मुंबईत प्रतिशिवसेना भवन उभारणीसह दसरा मेळावा व शिवसेना आमचीच असल्याचे सांगत विविध जिल्ह्यांमध्ये जाहीर सभा घेऊन आपली शिवसेना विस्तार करीत असल्याने चित्र आहे.

- Advertisement -

राज्यातील विविध भागातील लोक सध्या शिंदे गटात सामील होताना दिसत आहेत.नाशिक जिल्ह्यातील दोन आमदार व एक खासदार यापूर्वी शिंदे गटात सामील झाले असून आता शिवसेनेतील वरिष्ठ नेते तसेच माजी नगरसेवकांचा एक मोठा गट देखील शिंदे गटात सामील होण्याच्या मार्गावर आहे. मात्र नेमका मुहूर्त मिळत नसल्यामुळे प्रवेश सतत पुढे ढकलत असल्याचे समजते.

हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आम्ही बंड नव्हे तर उठाव केला असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेळोवेळी सांगितले आहे.2019 साली विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठ्या प्रमाणात राजकीय नाट्य रंगले होते. नंबर गेमच्या राजकारणात शिवसेना ही किंग मेकर म्हणून समोर आली होती. निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी आम्हाला अडीच वर्षे मुख्यमंत्री देणार असे सांगितले होते, हा मुद्दा शिवसेनेने उचलून धरला होता.

मात्र भारतीय जनता पक्षाच्या वतीने आम्ही असा कोणताही शब्द दिला नव्हता, असे सांगितले जात होते.शिवसेनेच्या 55 आमदारांशिवाय भारतीय जनता पक्षाला सत्ताही स्थापन करता येत नव्हती. यामुळे राज्यात नव्याने शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांनी एकत्रित येऊन महाविकास आघाडी तयार करून महाराष्ट्राची सत्ता काबीज केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले. शिवसेनेचा प्रवास कट्टर हिंदुत्ववादी संघटना ते पक्ष असा झाला आहे.मात्र बाळासाहेबांच्या निधनानंतर नंतर 2019 मध्ये जोडून आलेल्या समीकरणात ‘कॉमन मिनिमम प्रोग्राम’ च्या आधारे शिवसेना सत्तेत आली.

यामुळे शिवसेनेने बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार सोडले असा सतत आरोप देखील भारतीय जनता पक्षासह काहींच्या वतीने करण्यात येत होता. यानंतर दोन वर्षे करोना काळात गेली.सतत महाविकास आघाडी सरकार पडण्याच्या तारखा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून जाहीर होत होत्या. मे महिन्यात ऑपरेशन लोटसला यश प्राप्त झाले व शिवसेनेतील 40 आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोडून भारतीय जनता पक्षासोबत 30 जून रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर शिवसेना कोणाची हा नवीन संघर्ष देखील सुरू झाला.आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे नेत असल्यामुळे शिवसेना आमचीच असा दावा शिंदे गटाच्या वतीने करण्यात येत आहे.

या पार्श्वभूमीवर मुंबईत प्रतिशिवसेना भवन देखील तयार होणार आहे. तसेच लवकरच दसरा मेळावा देखील घेण्याची तयारी शिंदे गटाच्या वतीने करण्यात येत आहे. दुसरीकडे जिल्हा निहाय पदाधिकार्‍यांच्या, संपर्क प्रमुखांच्या नेमणूक देखील होताना दिसत आहे. दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील शिवसेनेचे दोन आमदार यापूर्वी शिंदे गटात असून नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार देखील शिंदे गटात सामील झाले आहे. मात्र संघटनेतील कोणताही मोठा नेता किंवा एकही माजी नगरसेवक शिंदे गटात अद्याप सामील झालेला नाही. दरम्यान, लवकरच नाशिक शिवसेनेतील एक मोठा गट शिंदे गटात सामील होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. यामध्ये माजी नगरसेवक यांच्यासह इतर बर्‍याच नेत्यांचा समावेश असल्याचे बोलले जात आहे.

चार माजी नगरसेवकांची नावे चर्चेत

नाशिकमधील चार शिवसेनेचे माजी नगरसेवक तसेच काही पदाधिकारी शिंदे गटात लवकरच सामील होणार असल्याचे वृत्त आहे. यामध्ये वाढ देखील होण्याची शक्यता आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून नाशिकची ओळख आहे तर शिवसेनेतील प्रमुख नेत्यांपैकी खा. संजय राऊत हे नाशिकचे संपर्कप्रमुख आहेत. राऊत सध्या तुरुंगात असल्यामुळे स्थानिक शिवसैनिकांमध्ये समन्वयाचा अभाव काही प्रमाणात दिसून येत आहे. नाशिक शहर तसेच जिल्ह्यात शिवसेनेत गटबाजी यापूर्वीपासून आहेत. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर या गटबाजीचा फायदा कोणाला होणार हे पाहणे देखील औत्सुक्याचे ठरणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या