माती नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर; देशदूत-मविप्र आयोजित ‘माती वाचवा’ कार्यक्रमात श्री. सद्गुरूंचे उद्गार

jalgaon-digital
10 Min Read

दंडकारण्यनगरी, नाशिक । प्रतिनिधी Nashik

माती ( Soil )नामशेष होण्याच्या अगदी उंबरठ्यावर आहे. 3 ते 6 टक्के सेंद्रीय सामुग्री स्तर असलेल्या मातीतून उगवलेले उच्च दर्जाचे अन्नधान्य विकसित करण्यासाठी प्रेरणा, प्रोत्साहन आणि जनतेचा उत्साह या त्रिसूत्रीचा अवलंब करावा लागेल. गेल्या 45 वर्षांत आपल्या मातीचे आरोग्य नष्ट झाले आहे. माती वाचवण्यासाठी आता रासायनिक शेतीतून सेंद्रीय शेतीकडे संक्रमण करण्यासाठी सर्व स्तरातून प्रोत्साहन मिळावे, असे कळकळीचे आवाहन ईशा फाऊंडेशनचे संस्थापक श्री. सद्गुरू (The founder of Isha Foundation, Shri. Sadguru)यांनी येथे केले.

दैनिक ‘देशदूत’ आणि नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्था ( Daily Deshdoot & Maratha Vidyaprasarak Sanstha ) यांच्या संयुक्त विद्यमाने श्री. सद्गुरू अर्थात जग्गी वासुदेव ( Jaggi Vasudev ) यांच्या बहुमोल मार्गदर्शनाचा भव्यदिव्य कार्यक्रम केटीएचएम महाविद्यालयाच्या विशाल मैदानावर ( KTHM College Ground ) आयोजित करण्यात आला. त्यावेळी श्री. सद्गुरूंनी नाशिककरांशी संवाद साधला.

एकतर्फी बोलण्याऐवजी उपस्थितांचा प्रतिसाद घेणे त्यांनी पसंत केले. कार्यक्रमास नाशिककरांचा उदंड प्रतिसाद लाभला. सदगुरूंवर प्रेम करणारे चाहते आणि श्रोत्यांनी मैदान खच्चून भरले होते. ‘माती वाचवा’ (Save Soil ) कार्यक्रमाचे प्रायोजक दीपक बिल्डर्स अ‍ॅण्ड डेव्हलपर्स, अ‍ॅग्रि सर्च (इंडिया) प्रा. लि., चंंदुकाका सराफ अ‍ॅण्ड सन्स प्रा.लि., इंंडियन ऑईल, डेअरी पॉवर लि., धुमाळ इंडस्ट्रीज तर रेडिओ विश्वास रेडिओ पार्टनर होते.

कार्यक्रमास पालकमंत्री छगन भुजबळ, खा. हेमंत गोडसे, आ. सीमा हिरे, मविप्रचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, सरचिटणीस नीलिमाताई पवार, संचालक नानासाहेब महाले, माणिकराव बोरस्ते, सचिन पिंंगळे, अमृता पवार, ‘देशदूत’चे संचालक रामेश्वर सारडा, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंंजन ठाकरे,चंंदुकाका सराफचे संचालक आदित्य शाह, निकेत फडे, अशोका ग्रुपचे अध्यक्ष अशोक कटारिया, नरेंद्र गोलीया, उमेश वानखेडे, किरण चव्हाण, नेमिचंंद पोद्दार, द्राक्ष बागायतदार संघाचे कैलास भोसले, सुरेश डोखळे, रवींद्र निमसे, दीपक बिल्डर्सचे ईशा चंदे, दीपक चंदे, दिनेश चंदे, अ‍ॅग्रि सर्च इंडियाचे संचालक प्रदीप कोठावदे, धुमाळ इंडस्ट्रीजचे अक्षय धुमाळ, विश्वास बँकेचे अध्यक्ष विश्वास ठाकूर, प्राचार्य व्ही. बी. गायकवाड, दिलीप डेर्ले, राज्य शिक्षण मंडळाचे विभागीय अध्यक्ष नितीन उपासनी, नेमिनाथ जैन संस्थेचे प्राचार्य उपासनी, तंत्रशिक्षणचे सहसंचालक डॉ. नाठे, मविप्र शिक्षणाधिकारी ज्ञानेश्वर काजळे, संंजय शिंदे, नानासाहेब पाटील, गरूडझेप अ‍ॅकेडमीचे पदाधिकारी आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

श्री सद्गुरूंचे आगमन होताच उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. ‘देशदूत’चे व्यवस्थापकीय संचालक जनक सारडा यांनी येवल्याच्या पैठणीतून तयार झालेली पुणेरी पगडी घालून सद्गुरूंचा सत्कार केला. मविप्र संस्थेच्या सरचिटणीस नीलिमाताई पवार यांनी शेला देऊन सद्गुरूंचा सत्कार केला. ‘देशदूत’चे अध्यक्ष विक्रम सारडा यांनी पुष्पहार घालून त्यांचे स्वागत केले. ‘देशदूत’च्या कार्यकारी संपादक डॉ. वैशाली बालाजीवाले यांनी पंचतत्त्वाच्या प्रतिकात्मक भेटवस्तू देऊन स्वागत केले. प्रास्ताविक जनक सारडा यांनी केले. स्वागतानंतर श्री. सद्गुरूंनी उपस्थितांशी संवादाला सुरुवात केली.

52 टक्के शेतजमिनी आधीच निकृष्ट झाल्याने जगातील मातीच्या संंकटाकडे तातडीने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. ती ओळखून सद्गुरूंनी गेल्या मार्चमध्ये मोटारसायकलीवर स्वार होऊन 100 दिवसांत 27 देशांत 30 हजार कि.मी.चा प्रवास केला. मरत असलेली माती आणि वाढत्या वाळवंटीकरणाविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी युरोप ते भारत असा दीर्घ आणि कष्टदायक प्रवास त्यांनी केला. ‘माती वाचवा’ अभियानाचा ( Save Soil Campaign )प्रवास निम्म्या मार्गावर पोहोचला आहे. गेल्या 50 दिवसांत सद्गुरूंनी मृदा वाचवण्याकडे जगाचे लक्ष वेधले. युरोप, मध्य आशियातील काही भाग तसेच मध्य पूर्वेतून प्रवास केला आहे. हिम, वाळूचे वादळ, पाऊस आणि शून्याखालील तापमान यासह अत्यंत धोकादायक परिस्थितीतून प्रवास करत सद्गुरू नाशिकला आले. प्रत्येक देशातील राजकीय नेते, मृदातज्ज्ञ, नागरिक, माध्यम कर्मी यांच्या भेटी घेऊन माती नष्ट होण्याच्या समस्येकडे लक्ष देण्याची गरज त्यांच्या निदर्शनास आणून दिली.

नाशिककरांशी संवाद साधताना श्री. सद्गुरू म्हणाले, माती हा आपला वारसा आहे, ती जतन करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा. ‘माती वाचवा’ अभियानाचा मूळ उद्देश माती नष्ट होणे टाळणे हा आहे. माती वाचवण्यासाठी जगातील सर्व देशांनी धोरण आखण्याची गरज आहे. त्यासाठी योग्य धोरणे बनवण्याची गरज आहे. लोकांना मातीचे महत्त्व कळत नाही. 74 राष्ट्रांनी ‘माती वाचवा’ अभियानाला प्रतिसाद देत या अभियानासाठी स्वाक्षरी केली आहे. जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचे जतन करणे आवश्यक आहे. माती ही आपली संपत्ती नसून तो आपल्या पिढीचा वारसा आहे. हा वारसा येणार्‍या पिढीला देण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. माती वाचवण्यासाठी पूर्वपार रुजलेली लोकचळवळ पुन्हा गतिमान करावी लागेल. विविध प्रकारच्या मातीची परिस्थिती, सांस्कृतिक आणि आर्थिक परंंपरांंच्या भिन्न संदर्भाचा विचार करून जमिनीच्या र्‍हासाची समस्या कशी हाताळायची यावर बारकावे शोधावे लागतील.

आपल्याला सुपीक जमीन वाचवण्यासाठी आकर्षक प्रोत्साहन देऊन 3 ते 6 टक्के सेंद्रिय सामग्रीचा थर टिकवणे आवश्यक आहे. त्याकरता शेतकर्‍यांना महत्त्वाकांक्षी बनवावे लागेल. प्रोत्साहनांतून स्पर्धा निर्माण होईल. अनेक वर्षे त्यांची अंमलबजावणी करावी लागेल. टप्प्याटप्प्याने कार्यक्रम राबवावा लागेल. पहिला टप्पा प्रेरणा देण्याचा, दुसरा प्रोत्साहन आणि शेवटी काही योग्यतेसह त्याचे फायदे दाखवून देणारा तिसरा टप्पा असावा, असे सद्गुरूंनी सांगितले.

मातीची गंभीर समस्या वेळीच ओळखा. हा धर्म, तत्त्वज्ञान, श्रद्धा-अंंधश्रद्धेचा विषय नाही तर मानव कल्याणासाठी, भावी पिढीसाठी उचललेले पाऊल आहे. यात सामान्य नागरिकांपासून शासनापर्यंंत प्रत्येकाचा सहभाग अपेक्षित आहे. ज्या मातीत 3-6 टक्के सेंद्रिय सामुग्रीचे लक्ष्य आहे, अशा मातीतून पिकवलेल्या अन्नासाठी आपल्याला उत्कृष्ट दर्जाचे चिन्ह विकसित करावे लागेल. सुपीक जमिनीतून उत्पादीत केलेल्या पौष्टिक अन्नधान्याचे फायदे समाजासमोर मांंडले पाहिजेत. या उपक्रमातूनच लोक अधिक निरोगी, उत्पादनक्षम आणि लवचिक होतील. त्यामुळे आरोग्यसेवा प्रणालींवरचा वाढता ताण कमी होईल. उच्च दर्जाच्या अन्नाच्या बोधचिन्हाचा केवळ तथाकथित ‘सेंद्रिय’ उत्पादन आणि ‘नॉन ऑर्गेनिक’ उत्पादनांमध्ये फरक करण्याचा प्रयत्न करण्याच्या सध्याच्या प्रणालीपेक्षा त्याला कितीतरी जास्त अर्थ असेल, असेही सद्गुरूंनी स्पष्ट केले. कार्यक्रमाचा समारोप सद्गुरुंंनी ’सेव्ह सॉईल’ अँथमने करताच श्रोत्यांंनी उभे राहून त्यांना उत्स्फूर्त दाद दिली.

सूत्रसंंचालन डॉ. वैशाली बालाजीवाले यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी दैनिक देशदूत परिवार, मराठा विद्या प्रसारक समाज संस्था, ईशा फौंडेशन व असंंख्य सेवाभावी संस्थांच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. नाशिककरांंनी मातीचे आरोग्य जपण्याचा व तिचा र्‍हास थांबवण्याचा संकल्प केला.

दोन दिवसापासून रोज सायंंकाळी जोरदार पावसाची हजेरी लावणार्‍या वरुणराजाने आज विश्रांती घेतली. ढगाळ वतावरण होते. गार वारे वाहत होते. मात्र पावसाचा एक थेंबही बरसला नाही. त्यामुळे कार्यक्रम निर्विघ्न पार पडला. शहर पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, उपायुक्त अमोल तांबे, सहाय्यक आयुक्त दीपाली खन्ना, सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक साजन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला.

भूकबळीपासून जगाला दूर ठेवण्यासाठी

मंगळ आणि चंद्रावरून अन्न येणार नाही. तेव्हा पृथ्वीवरील माती वाचवलीच पाहिजे. आपण मातीतून जन्मलो आणि पुन्हा मातीत मिसळणार आहोत. मातीत केवळ नैसर्गिक घटकच मोठ्या प्रमाणात असायला हवेत असे नाही तर रासायनिक घटक कमी प्रमाणातही असायला हवेत. त्यामुळे मातीची शक्ती कायम राहते. सध्या देशातील मोठ्या भागात मातीची शक्ती कमी होत आहे. माणसाच्या वागणुकीमुळे कसलेल्या मातीचा र्‍हास झाला आहे. आपण 50 टक्के जमीन संपवून टाकली आहे. भविष्य सुरक्षित आणि भूकबळीपासून जगाला दूर ठेवायचे असेल, येणार्‍या पिढीला सुरक्षित ठेवायचे असेल तर माती वाचवलीच पाहिजे. संकट रोखायचे असेल तर सगळ्यांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे. यात सरकारची महत्त्वाची भूमिका आहे. यासाठी माती वाचवण्यासाठी विशेष धोरण आखले पाहिजे. ज्यात शेतकर्‍यांना केंद्रस्थानी ठेवायला हवे. जैविक शेतीसाठी शेतकर्‍यांना प्रोत्साहित करायला हवे. त्यामुळे मातीची गुणवत्ता कायम ठेवता येईल. जमीन ही स्थावर मालमत्ता असल्याने पिढ्यान्पिढ्या तिचा वापर होणार आहे. तिची जोपासना करणे आपले कर्तव्य आहे.

नाशिकच्या कला संस्कृतीचे दर्शन

सद्गुरूंच्या नाशिक भेटीनिमित्त आयोजित कार्यक्रमात नाशिकच्या कला आणि संस्कृतीचे दर्शन घडवणारे कलाविष्कार सादर झाले. पेठ तालुक्यातील कलाकारांनी आदिवासी नृत्य सादर केले. अख्तरभाई शेख यांच्या नाशिक ढोलवादनाने परिसर दुमदुमून गेला. मविप्रच्या छत्रपती शिवाजी विद्यालय, मखमलाबादच्या लेझीम पथकाने उत्तम सादरीकरण केले. पं. डॉ. अविराज तायडे, रेखाताई नागगौडा, सोनाली करंदीकर, आदिती पानसे, सुमुखी अखनी, दीपा मोनानी, नितीन वारे, नितीन पवार, अनिल धुमाळ, अभिजित शर्मा, मोहन उपासनी, नरेंद्र पुली, पार्थ शर्मा व शिष्यवृंदाने संगीत नृत्य आविष्कार सादर केला.

भाषणाचा मराठीतून लाभ

श्री सद्गुरू यांना ऐकण्यासाठी आलेल्या नाशिककरांना मराठीत भाषांतर ऐकू येताच टाळ्यांच्या कडकडाटात परिसर दणाणून सोडला होता. माती वाचवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा शब्द नाशिककरांनी देताच सद्गुरू यांनीही आभार मानले. रेडिओ फ्रिक्वेन्सीद्वारे 96.0 या रेडिओवर हा कार्यक्रम मराठीतून ऐकता आल्याने कार्यक्रमासाठी आलेल्या शेतकरी बांधवांनी ‘देशदूत’चे मनोमन आभार मानले.

निसर्गाची साथ

आजचा कार्यक्रम निसर्गाचे चक्र अव्याहत सुरु राहावे यासाठीच होता. आकाशात काळे ढग दाटून आलेले असतानाही पावसाचा एक थेंबही कार्यक्रमप्रसंगी पडला नाही. जणू निसर्गाच्या कार्यक्रमाला निसर्गानेच साथ दिली. उलट थंड वारे वाहून नाशिकच्या अल्हददायक वातावरणाची प्रचिती सदगुरुंना दिली.

क्षणचित्रे

सद्गुरूंचे बाईकवरूनच थेट व्यासपीठाजवळ आगमन झाले. यावेळी लेझीम पथक आणि मानवी साखळी करून त्यांचे स्वागत करण्यात आले.

सद्गुरू यांच्या आगमनानंतर अनेक शिष्य भावूक झालेले दिसले. आनंदाने अनेक जण नाचू लागले.

सदगुरुंचे भाषण होईपर्यंत अऩेक श्रोते हात जोडून उभे होते.

सदगुरुंच्या भाषणाला ‘सेव्ह सॉईल’च्या घोषणा देत उत्स्फुर्त दाद देत होते.

एक चाहता अंगावर माती लावून सहभागी झाल्याने तो सर्वांचे लक्ष वेधुन घेत होता.

कार्यक्रमस्थळी पाचशे स्वयंसेवक सकाळपासून राबत होते. त्यामुळे प्रचंड गर्दी होऊनही येणार्या श्रोत्यांंची कोठेही गैरसोय झाली नाही.

संपूर्ण मैदान खचाखच भरल्याने काही श्रोत्यांनी उभे राहुन कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.

आजपर्यत ज्या सदगुरुंचे विचार समाज माध्यमांतुन ऐकले होते तेच सदगुरु आज साक्षात पाहुन अनेकांच्या डोळ्याचे पारणे फिटले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *