माती जीवनाचा अविभाज्य घटक

 माती जीवनाचा अविभाज्य घटक

निफाड। प्रतिनिधी Nashik

सजीवसृष्टीत मातीला ( Soil ) सर्वाधिक महत्त्व आहे. माती असेल तर झाडे, वनराई, शेतमाल, फळे, फुले, पाणी याबरोबरच वातावरणात ऑक्सिजन टिकून राहील. त्यामुळेे माती वाचवण्याला प्रत्येकाने प्राधान्य दिले पाहिजे. सध्या माती निकस होत असून रासायनिक खतांचा (chemical fertilizers)अतिवापर त्यास कारणीभूत ठरत आहे.

शेतीला विश्रांतीचीदेखील गरज आहे. माती वाचवावयाची असेल तर वृक्षारोपणाला महत्त्व देऊन लावलेल्या वृक्षांचे संगोपन केले पाहिजे. माणूस यंत्राच्या गतीने धावू लागल्याने व जास्तीत जास्त उत्पादनाच्या हव्यासापोटी जमिनीची झीज होत आहे. झाडांची कत्तल होत असल्याने उष्णतेचे प्रमाण वाढले. वातावरणात ऑक्सिजनचेे प्रमाण घटत आहे. साहजिकच निसर्गाचा समतोल ठेवावयाचा असेल तर माती वाचवणे गरजेचे आहे. कारण माती वाचली तर सजीव वाचतील.

- पांडुरंग कर्डिले, उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती

मातीचे संगोपन हीच काळाची गरज

जंगल नाहीसे होत असून मातीचे प्रमाणदेखील कमी होत आहे. आहे त्या मातीत उत्पन्नाचे प्रमाणदेखील घटले आहे. मात्र अद्यापही माणूस सुधारण्यास तयार नाही. मातीची सुुुपीकता (Soil fertility)वाढवण्याबरोबरच तिला विश्रांतीचीदेखील गरज आहे. कारण माती असेल तरच आपण शेती पिकवू शकतो. त्यामुळे प्रत्येकाने काळ्या आईची सेवा करणे गरजेचे आहे. गेल्या काही वर्षांपासून जमिनीची सुपीकता कमी होत आहे. खते आणि पाण्याच्या अतिवापरामुळे जमीन क्षारयुक्त होत असून उत्पादन खर्चात वाढ होऊनदेखील पाहिजे त्या प्रमाणात उत्पादन मिळत नाही. त्यामुळे जमिनीला विश्रांतीची गरज निर्माण झाली आहे. स्पर्धेच्या युगात जंगले नामशेष होत असल्याने जंगली जनावरे गावाकडे फिरकू लागली आहेत. नैसर्गिक नदी, नाले नाहीशी झाली असून नद्यांची जागा आता नाल्यांनी घेतली. त्यामुळेे नैसर्गिक वातावरण नाहीसे झाले आहे. या सर्व विनाशास आपणच जबाबदार असून सजीवसृष्टी टिकवून ठेवावयाची असेल तर प्रथम माती टिकवणे गरजेचे आहे.

- अ‍ॅड.स्वप्निल ठाकरे, निफाड

यांत्रिकीकरणाचा वाढता वापर धोकादायक

सध्या शेतीत आमूलाग्र बदल होत असून शेती मशागतीसाठी यांत्रिकीकरणाचा वापर मातीसाठी धोकादायक ठरत आहे. पूर्वीच्या काळी बैलजोडीने शेती मशागत केली जात होती. परिणामी जनावरांचे शेणखत मातीत मिसळले जात असे. तसेच उन्हाळ्यात जमीन पडिक राहिल्यामुळे तिला विश्रांती मिळून पावसाळी पिके जोमदार तसेच कसदार येत असत. मात्र शेतीत यांत्रिकीकरणाचा वापर वाढल्याने जमिनीची धूप होऊ लागली. जमिनीतील अन्नद्रव्याचे प्रमाण घटले. साहजिकच सुपीकता नष्ट झाली. म्हणजेच मातीचा कस घटला. पुढील धोक्याचा इशारा लक्षात घेता माती वाचवणे हाच उपाय आहे. मात्र त्यासाठी सर्वसमावेशक प्रयत्नांबरोबरच जनजागृतीदेखील झाली पाहिजे.

- कुंदन क्षीरसागर, संचालक, श्रीनिवास अ‍ॅग्रो (निफाड)

मातीत पिकते म्हणूनच विकते

माती आहे म्हणून शेती आहे आणि शेतीत पिकते म्हणून ते विक्री करता येते. मातीच नसेल तर जगणे अवघड होईल. म्हणून मातीला महत्त्व दिले पाहिजे. आज मातीचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे मातीतील पीक उत्पादन क्षमता घटत चालली आहे. माती ही आपली आई आहे. म्हणून तिची सेवा केली पाहिजे. मातीतून सोनं पिकवले जाते. मात्र अतिहव्यासामुळे माती निर्जिव होत आहे. त्यामुळे मातीचे महत्त्व वेळीच ओळखले पाहिजे. त्यासाठी माती वाचवण्यास शिकले पाहिजे.

- भाऊसाहेब बोचरे, शेतकरी (देवगाव)

झाडे वाचली तर माणसे वाचतील

माती वाचली तर झाडे वाचतील आणि झाडे वाचली तर माणूस वाचेल. आज पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. ऋतुचक्र बदलत चालले आहे. पावसाळ्याच्या ठिकाणी कडक ऊन पडते तर उन्हाळ्यात थंडी वाजते. थंडीच्या ऋतूत पाऊस सुरू असतो. निसर्गात होत असलेला हा बदल माणूस अद्यापही समजून घेण्यात तयार नाही. त्यामुळे आताच्या परिस्थितीत यावर सकारात्मक बदल घडवून आणावयाचा असेल तर माती वाचवणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे. त्यासाठी स्वत:पासून त्याची सुरुवात करून माती वाचवण्यासाठी इतरांना परावृत्त केले पाहिजे.

- किशोर पाटील, युवक (कुंदेवाडी)

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com