Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याराज्यातील शेतकऱ्यांसाठी 'इतके' सौर कृषीपंप बसविणार

राज्यातील शेतकऱ्यांसाठी ‘इतके’ सौर कृषीपंप बसविणार

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

राज्यातील शेतकऱ्यांसाठी यावर्षी दोन लाख सौर कृषीपंप (Solar Agricultural Pumps) बसविण्याचे उर्जा विभागाचे लक्ष्य आहे. केंद्र सरकारच्या कुसुम आणि मेडाच्या माध्यमातून प्रत्येकी एक लाख असे एकूण दोन लाख कृषीपंप लावण्यात येणार आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा उर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

- Advertisement -

महावितरणने आवश्यकतेनुसार सुरूवातीला शहरी भागातील ग्राहकांकडे स्मार्ट मिटर बसवावेत. या कामात यशस्वी झाल्यानंतरच ग्रामीण भागातही स्मार्ट मिटर बसविण्यात यावेत. याशिवाय स्मार्ट मीटर हे चांगल्या कंपनीचे आणि उच्च दर्जाचे असावेत, अशी सूचनाही फडणवीस यांनी केली.

देवेंद्र फडणवीस यांनी आज वांद्रे येथील महावितरणच्या प्रकाशगड या मुख्यालयात जाऊन उर्जा विभागाचा आढावा घेतला. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना फडणवीस यांनी बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती दिली. ज्या शेतकऱ्यांनी वीज जोडणीसाठी पैसे भरले पण जोडणी मिळाली नाही अशा मार्च २०२२ पर्यंतच्या प्रकरणात शेतकऱ्यांना वीज जोडणी दिली जाईल, असे फडणवीस यांनी सांगितले.

राज्यात जे कृषी फीडर स्वतंत्र झाले आहेत त्यांना सौर उर्जेवर आणण्याचा प्रकल्प आपण राबवत आहोत. चार हजार मेगावाटचे फीडर्स सौरउर्जेवर आणण्याचा आपला प्रयत्न आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळेल याशिवाय कृषी विजेसाठी दिले जाणारे अनुदान मोठ्या प्रमाणात कमी होईल. सौरउर्जेच्या प्रकल्पासाठी जी जमीन लागते ती आम्ही शेतकऱ्यांकडून भाड्याने घेऊ. ही जमीन शेतकऱ्यांच्या नावेच राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न मिळेल, असे फडणवीस म्हणाले.

फडणवीस यांनी महावितरण सोबतच महानिर्मिती, महापारेषण आणि महाऊर्जा या चारही वीज कंपन्यांच्या कामाचा आढावा घेतला. महावितरणने इतर कंपन्यांची थकीत देणी देण्यासाठी केंद्र शासनाला पत्र पाठवून त्याचा पाठपुरावा करावा. याशिवाय फोटो मीटर रीडिंगचे फोटो मानवी हस्तक्षेप टाळून थेट सर्व्हर प्रणालीमध्ये येण्यासाठी प्रयत्न करावेत. सौर ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक करण्यास उत्सुक असलेल्या गुंतवणूकदारांसोबत प्राधान्याने चर्चा कराव्यात, असेही त्यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या