स्मार्ट रोड : सायकल ट्रॅकवर पार्किंग

स्मार्ट रोड : सायकल ट्रॅकवर पार्किंग

नाशिक । प्रतिनिधी Nashik

शहरात सर्वाधिक चर्चेचा असलेल्या स्मार्ट रोड ( Smart Road ) वरील ट्रॅफिक (traffic) हा विषय शहरातील नागरिक, पोलीस यांच्या दृष्टीने महत्वाचा झाला आहे. या ठिकाणी होत असलेल्या बेशिस्त पार्किंगमुळे रस्ता दिवसभर जॅम होत असल्याचे दिसून येत आहे. तसेच या स्मार्ट रोडवर असलेला सायकल ट्रॅक (Cycle track) खाजगी वाहनांसाठी पार्किंग स्पॉट झाला आहे.

या रस्त्यावर महत्वाचे असे जिल्हाधिकारी कार्यालय, होमगार्डचे ऑफिस, जिल्हा सत्र न्यायालय, छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम आणि सेंट्रल बस स्थानक या महत्वाच्या कार्यालयांचे प्रवेशद्वार आहे. त्यामुळे हा रस्ता नेहमीच रहदारीचा रस्ता म्हणून ओळखला जातो.

साधारणपणे तीन वर्षांपूर्वी या रोडचे उद्घाटन झाले. शहरात प्रदूषण कमी व्हावे. सायकलचे प्रमाण वाढावे या उद्देशाने स्मार्ट रोड बनविताना रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पादचारी मार्ग आणि वाहतुकीच्या रस्त्याच्या मध्ये एक सायकल ट्रॅक करण्यात आला. या सायकल ट्रॅकची चर्चा देखील मोठ्या प्रमाणात झाली. मात्र, सध्याचे वास्तव बघता या ट्रॅकचा वापर सायकल चालविण्यासाठी कमी पण अवैध पार्किंगसाठीच होत असल्याचे बघायला मिळते.

तसेच गेल्या ऑक्टोबर महिन्यात जिल्हा सत्र न्यायालयाच्या नवीन इमारत बांधणीला सुरुवात झाली असल्याने आता न्यायालयाच्या मोकळ्या जागेत पार्किंग न होता ती सरळ सरळ पादचारी मार्गावर होत असल्याने पायी चालणार्‍या नागरिकांना देखील त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

याठिकाणी कामानिमित्त येणार्‍या नागरिकांना गाड्या कुठे पार्क कराव्या हा प्रश्न असतो. न्यायालयात असलेली पार्किंग ही फक्त वकिलांसाठी राखीव ठेवण्यात आलेली आहे. त्यामुळे वाहनधारक सर्रास पादचारी मार्ग आणि सायकल ट्रॅक वर वाहने पार्क करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com