'स्मार्ट' गोदाघाट

रामकुंड चौक परिसर खड्ड्यात; रामसेतू तोडू देणार नाही; पंचवटीकरांचा इशारा
'स्मार्ट' गोदाघाट

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिकचा मानबिंदू ,जगभरातील साधुसंत व धार्मिक लोकांच्या आकर्षणाचा केंद्र असलेला गंगाघाट ( Godaghat )परिसराची वाट सुशोभीकरणाच्या नावाखाली गेल्या दोन वर्षापासून अडचणीत सापडली असल्याचे चित्र आहे. सरदार चौक, गंगा गोदावरीच्या रामकुंड परिसरात ( Ramkund Area )रस्त्याच्या कामाला संथ गती होती.यात रामरथामुळे कामे पूर्ण झाली. मात्र त्यापाठोपाठ रामकुंड चौकाच्या दोन्ही बाजूच्या रस्त्यांना एकाच वेळी खोदल्यामुळे वाहनांच्या आवागमनाचा मार्गच बंद झाला. परिणामी चौकात वाहतूक कोंडी ( Traffic Jam ) होऊ लागल्याचे चित्र आहे.

वाचनालयाकडून येणारा रस्ता व सिग्नलच्या दिशेने जाणार्‍या रस्त्यावर दुतर्फा वाहनांची पार्किंग व दुकानांची गर्दी असल्याने वाहनचालकांना वाहने उभी करण्यास अडचण निर्माण होत आहे. त्यासोबतच वाहनांच्या आवागमनाला जागाच मिळत नसल्याने वाहतुकीची प्रचंड कोंडी दिसून येत आहे.

प्रत्यक्षात स्मार्ट सिटी व्यवस्थापनाकडे कामाच्या व प्रत्यक्ष जागेच्या परिस्थितीबद्दल कोणताच अभ्यास दिसून येत नाही.

ठेकेदार, मनपा प्रशासन, पोलिस दल यांच्याशी स्मार्ट सिटीचा कोणताच समन्वय नसल्याचे चित्र आहे.एकाच वेळी चौकातील दोन्ही रस्ते फोडण्यात आले. त्यासोबतच कपालेश्वरच्या दिशेने जाणार्‍या चौकातही रस्ता बंद करण्यात आला आणि दर्शनासाठी येणार्‍या भाविकांनी तसेच दशक्रिया विधी व वितरण कार्यक्रमाला आलेल्या लोकांनी वाहने कुठे लावावी याबद्दल संभ्रमावस्था दिसून येत आहे.

यातच चौकांमध्ये रिक्षाचालकांची व दुचाकी वाहनांची गर्दी त्यामुळे नेमक्या गाड्या कुठल्या दिशेने वळवाव्या यासाठी दिशादर्शक नसल्याने वाहनचालक त्रस्त असल्याचे दिसून येत होते. गेल्या वर्षी कोवीडमुळे मृत झालेल्यांची संख्या मोठी असल्याने यंदा वर्षश्राद्धसाठीही गंगाघाटावर मोठी गर्दी होती. या सर्व गर्दीला रस्त्यांचे नियोजन नसल्यामुळे मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. गंगाघाटावर हॉलकडे जाणे, पिंड पूजन करणे या सर्व धावपळीत मार्ग सापडत नसल्याने नवीन आलेल्या पाहुण्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने रामकुंड परिसराला वाली आहे की नाही?असा प्रश्न निर्माण होत आहे.

रस्त्याला दगड लावण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे रस्ता मजबूत होणार आहे. नदी पात्रात खडक खड्डे होते.लोक बुडू नये यासाठी काँक्रीट केले होते. रस्त्यासोबतच 60 वर्षे जुनी पाईपलाईन दुरुस्त करण्यासाठी काम होत आहे. ते चांगले आहे.त्यामुळे नदीपात्रात गटारींचे पाणी जाणार नाही. मोठी पाईप लाईन जोडण्याचे काम होत आहे. काही चांगले होण्यासाठी त्यामुळे थोडा काळ त्रास सहन करावा लागेल.

मनोहर उदासी, गंगा परिसरातील सेवाभावी कार्यकर्ते

स्मार्ट सिटीच्या कामात दर दोन किलोमीटरला खड्डे केलेत.एकही काम पूर्ण न होता सर्व ठिकाणी अडचण निर्माण केली आहे. पुढे पार्कींग आहे असे म्हंटले जाते. अवश्य पार्किंग आहे.परंतू पार्कींगपर्यंत जाण्यासाठीचा मार्गच बंद करुन टाकलेला आहे. त्या पार्कींगचा काय उपयोग?,हा रस्ता बंद न करता दुसरा मार्ग देणे गरजेचे आहे. कामाच्या ठिकाणी मटेरीयलला मार्गच नाही.24 तास काम सुरू ठेवून तातडीने काम पूर्ण करावे. यातून काम लवकर कसे होईल याचा विचार होणे गरजेचे आहे.गंगाघाटावर एकाच वेळी दोनही रस्ते बंद करण्यापेक्षा एक काम पूर्ण करुन दुसरे सुरू केले असते तर बरे झाले असते.

गौरव देसाई, नागरिक

रामसेतू तोडू देणार नाही; पंचवटीकरांचा इशारा

गोदावरी नदीवर ऐतिहासिक रामसेतू पूल हा पंचवटी आणि नाशिक शहराला जोडणारा जुना दुवा आहे.हा रामसेतू पूल तोडण्याचा प्रयत्न कदापी खपवून घेतला जाणार नाही,असा इशारा पंचवटीकरांनी दिला आहे.

गेल्या काही दिवसापासून स्मार्ट सिटी कंपनीकडून हा पुल जुना झाला,धोकादायक झाला म्हणत तोेडण्याच्या बातम्या येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर आज देशदूतने येथील जनतेचा त्याबाबत कानोसा घेतला असता हा इशारा देण्यात आला. या पुलावर अनेक वर्षापासून छोटे व्यावसायिक पोट भरत आहेत.पूर्वी नाशिकला पंचवटीशी जोडणारा हा पुल होता.2003 मध्ये त्याला समांंतर पुल बांधला. त्याच्या शेजारचा सांडवा तोडला.त्यामुळे सांडव्यावरची देवीची ओळखच पुसली गेली. दुसरा सांडवा केला. त्यामुळे उलटे पुराचे पाणी धड़कल लागलेे.

हा रामसेतू पूल जुना असला तरी फक्त पादचार्‍यांसाठीच आहे. त्यावर एकही वाहन जात नाही. त्याला कोणताही धोका नाही. थोडी डागडुजी करण्याची व पायर्‍यांना दुरुस्तीची आणि अँगल बसवण्याची फक्त गरज आहे. ते उपचार सोडून भलताच उद्योग करण्यांच्या विरोधासाठी पुल बचाव अभियान सुरु झाले आहे.

नारोशंकर मंदिराजवळील दोन सांडवे तोडण्यात आल्याने नागरिकांना ये-जा करण्यासाठी रामसेतूचा मोठा आधार आहे. तो तोडला तर मार्गक्रमणासाठी प्रचंड अडचणी येणार आहेत. यासाठी रामसेतू तोडण्यास आमचा विरोध असल्याचे त्यांनी सांगितलेे. विशेष म्हणजे, रामसेतू पुलाची उभारणी इंग्रज कालीन आहे. अनेक पुराचे तडाखे खाऊन रामसेतू उभा आहे. विकास करायचा असेल ऐतिहासिक स्थळे टिकतील हेही पहावे. आम्ही रामसेतू तोडू देणार नाही, असे ते म्हणाले.रामसेतू तोडल्यास शेकडो कुटुंंबे उदरनिर्वाहापासून वंचित होतील. जाण्या-येण्याचा प्रश्न निर्माण होईल.रामसेतू आहे त्या स्थितीत मजबुतीकरण व सुशोभिकरण करणेच हिताचे आहे.

सुनील महंंकाळे

होळकर पुलाखाली यांत्रिक दरवाजा

स्मार्ट सिटी कंपनीच्या वतीने सध्या होळकर पुलाखाली यांत्रिक गेट बसवतानाच, प्रोजेक्ट गोदाअंतर्गत रामवाडी ते होळकर पुलाच्या दरम्यान कामे सुरू आहेत. या ठिकाणी नदीपात्रात सिमेंट काँक्रीटची भिंत बांधली जात आहे. यांत्रिक गेट बसविण्यासाठी गांधी तलावात ग्राउंड क्लीयरन्स किती ? यांत्रिक गेट उभारल्यानंतर पुराच्या पाण्याने हे गेट उघडल्यानंतर किती लांबपर्यंत जाईल याबाबत सर्वेक्षण केले आहे का ? समोर नाशिकच्या सौंदर्यात भर टाकणारे जुने वाडे आहेत, त्या वाड्यांना यामुळे धक्का लागण्याची शक्यता असून त्यामुळे अनुचित प्रकार घडण्याची शक्यता आहे.

निलकंठेश्वर मंदिर पायर्‍या पुरातत्वच्या

गेल्या महिन्यात गोदाकाठी असलेल्या निलकंठेश्वर मंदिराच्या पायर्‍या फोडण्याचा घाट स्मार्ट सिटी कंपनीने घातला होता. पुरातत्त्व विभागाच्या संवर्धनात असलेल्या या पायर्‍यांवर स्मार्ट सिटी कंपनीने हातोडा मारलाच कसा याबाबत पुरातत्व विभागाने तातडीने प्रत्यक्ष पाहणी करत आक्षेप नोंदवत पूर्ववत करून देण्याबाबत सूचना केल्या होत्या. तसेच पूर्ववत करताना तसाच दगड मिळविण्याच्या सूचना दिल्या होत्या. याबाबत पुन्हा असे करण्यापूर्वी चर्चा करू असे उत्तर देण्याची नामुष्की स्मार्ट सिटीवर आली होती.

वस्रांतर गृहाचे तीन तेरा

गोदावरी नदीत स्नानासाठी आलेल्या महिला भाविकांसाठी भले मोठे वस्रांतर गृह उभारण्यात आले आहे. याठिकाणी प्रवेश केल्यानंतर सहा- सात भिकार्‍यांची रांग लागलेली दिसली. उजव्या बाजूला पुरोहित संघाचे कार्यालय आहे. याठिकाणी एका व्यक्तीने थोडीशी माहिती सांगितली. वरच्या मजल्यावर मयतांच्या नातलगांनी नोंदणी केल्यानुसार त्यांच्या पूजेचे विधी सुरु होते. तर महिला वस्रांतर गृहाचा गेट पूर्णपणे उघडा होता. एकही महिला याठिकाणी दिसून आली नाही.अनुचित प्रकार टाळण्यासाठी याठिकाणी सुरक्षारक्षक असला पाहिजे असे एका महिला भाविकाने सांगितले. पुरोहित संघाच्या कार्यालयातून गोदावरीचे पात्र दिसून आले. याठिकाणी महिलांसह पुरुष भाविक स्नान करून जिथे जागा मिळेल तिथे कपडे बदलत होते. त्यामुळे या वस्रांतर गृहाचा उद्देश काय? हा प्रश्न अनुत्तरीत राहीला.

Related Stories

No stories found.