Wednesday, May 8, 2024
Homeमुख्य बातम्यास्मार्ट सिटीचा कारभार संथ गतीने

स्मार्ट सिटीचा कारभार संथ गतीने

नाशिक । प्रतिनिधी Nashik

विशेष महासभा घेऊन नाशिक स्मार्ट सिटीच्या ( Nashik NMC- Smart City Company ) कामांचा पंचनामा करून थेट कंपनी बरखास्त करण्याची मागणी नगरसेवकांनी केली होती. तर मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निलंबित करण्याचा ठरावदेखील झाला होता. यानुसार शासनाने अधिकारी बदलून दिले, मात्र शहराची वाट लावण्याचे काम सुरू होते. ते सुरूच असल्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

- Advertisement -

राज्याचे मुख्य सचिव तथा स्मार्ट सिटी अध्यक्ष कुंटे ( Smart City President Kunte ) यांनी नाशिक दौर्‍यात आढावा घेऊन स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल यांची बदली करून त्या ठिकाणी सुमंत मोरे यांची नेमणूक केली. मोरे यांनी सूत्रे हातात घेऊन बराच काळ उलटला तरी स्मार्ट सिटीच्या कामांच्या गतीत वाढ झाली नाही, तर उलट संथ गतीने काम होत असल्याची तक्रार होत आहे. शहरातील विविध महत्त्वाच्या ठिकाणी व मुख्य रस्त्यांच्या कडेला सध्या मोठ्या प्रमाणात खोदकाम करून ठेवण्यात आले आहे.

अनेक ठिकाणी खोदकाम झाल्यावर मातीदेखील उचलण्यात आलेली नाही. शहरातील सारडा सर्कल, गंजमाळ, शालिमारसह अनेक ठिकाणी मातीचे ढीग पडून आहेत. त्या ठिकाणी संरक्षण जाळ्या लावण्यात आल्या आहेत. यामुळे शहरातील संपूर्ण वाहतूक व्यवस्था बिघडली आहे. नाशिक महापालिका निवडणूक आता फक्त सहा महिन्यांवर येऊन ठेपली आहे. यामुळे नगरसेवक निवडणुकीच्या तयारीला लागले असून नाशिक महापालिकेच्या वरिष्ठ पदाधिकार्‍यांमध्ये वाद सुरू आहेत.

महापौर विरुद्ध मनपा आयुक्त असा संघर्षदेखील सुरू झाल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर स्मार्ट सिटीच्या कारभाराकडे कोण लक्ष देणार? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. स्मार्ट सिटी कंपनीकडे सध्या खूप पैसा आहे. नाशिक महापालिकेच्या वाट्यातील 250 कोटी रुपयांपैकी 200 कोटी रुपये अदा झालेले आहेत.

तसेच केंद्र व राज्य शासनाकडूनही स्मार्ट सिटी कंपनीला मोठी रक्कम मिळालेली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 150 कोटी रुपयांपर्यंत खर्च झालेला आहे. यानुसार गणित केल्यास स्मार्ट सिटीकडे सध्या पैशांची कमी नाही तर कामांची गती का वाढवण्यात येत नाही? कंपनीवर कोणाचा दबाव आहे का, असा प्रश्नदेखील उपस्थित केला जात आहे.

शहरातील चांगला मार्ग असलेल्या महात्मा गांधी रोड स्मार्ट सिटीकडून खोदण्यात येणार नाही असे ठरलेले असताना पुन्हा रस्त्याच्या कडेला पाईप टाकण्यासाठी खोदकाम सुरू झाले आहे. यशवंत व्यामशाळेजवळचा मार्ग खोदून सुमारे दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ झाला तरी तेथील माती अद्याप साफ करण्यात आलेली नाही. तर आता पुन्हा रस्ता खोदण्यात येत असल्याने व्यापार्‍यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या