
मुंबई (Mumbai)
केरळमध्ये (Kerala) वेळेआधीच मान्सून (monsoon) दाखल झाल्याची घोषणेवरून हवामान अंदाज देणाऱ्या संस्थांमध्येच जुंपल्याचे चित्र निर्माण झाले आहे. एकमेकांचे दावे खोडून काढणारे दावे आयएमडी (IMD) आणि स्कायमेटने (Skymet) केले आहेत. यामुळे देशात मान्सून आला की नाही, असा प्रश्न आता देशासमोर उपस्थित झाला आहे.
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजावर 'स्कायमेट या हवामान संस्थेनं शंका उपस्थित केली आहे. केरळमध्ये तीन दिवसांपूर्वी मान्सून दाखल झाल्याची घोषणा भारतीय हवामान विभागानं केली. पण एका दिवसाच्या निरीक्षणावरून कोणताही निकष काढणं हे निकषांचं उल्लंघन असल्याचं स्कायमेटनं म्हटलं आहे. मान्सून अद्याप केरळमध्ये दाखल झाला नसल्याचा दावा स्कायमेटन केला आहे. मात्र स्कायमेटचा हा आक्षेप हवामान खात्यानं फेटाळून लावला आहे.
देशात मान्सूनच्या आगमनासाठी भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या म्हणजेच आयएमडीच्या नियमांनुसार, मान्सून अद्याप भारतात दाखल झालेला नाही असं स्कायमेटनं म्हटलं आहे. केरळ, लक्षद्वीप आणि कर्नाटकमधील आठ ठिकाणांवर सलग दोन दिवस किमान २.५ मिमी पाऊस पडतो तेव्हा देशात मान्सून घोषित केला जातो. त्यानंतरच हवामान विभाग मान्सूनच्या आगमनाची घोषणा करतं. मात्र रविवारपर्यंत आठ ठिकाणांऐवजी केवळ पाच स्थानकांवरच २.५ मिमी पाऊस झाला आहे. त्यामुळे हवामान खात्याच्या अंदाजावर स्कायमेटनं प्रश्न उपस्थित केला आहे.
हा अंदाज फेटाळून लावत भारतीय हवामान खात्याने स्पष्टीकरण दिलं आहे. या पाच भागात सलग दोन दिवस ०.५ मिमी पाऊस पडला नाही तरी फारसा फरक पडत नाही. शनिवारपर्यंत हवामान संबंधित निकषांवर पोहोचलं, त्यामुळे मान्सून दाखल झाल्याची घोषणा करण्यात आली. काही दिवसांपूर्वी केरळमध्ये मान्सूनचे आगमन काही दिवसांनी लांबणार असल्याचं हवामान खात्याने सांगितलं होतं. त्यानंतर काही आठवड्यांनंतर मान्सून केरळमध्ये काही दिवस आधीच दाखल होईल, असं हवामान खात्यानं सांगितल होतं.
काही स्वतंत्र हवामान संस्था आणि हवामानतज्ज्ञांनी हवामान खात्याच्या मान्सूनच्या घोषणेवर टीका केली आहे. पावसाचे निकष पूर्ण न करूनही हवामान खात्यानं मान्सूनचं वेळेपूर्वी आगमन झाल्याचं जाहीर केलं, हे योग्य नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. या टीकेला उत्तर देताना हवामान विभागाचे महासंचालक एम महापात्रा यांनी सांगितलं की, दुसऱ्या दिवशी जरी आपण पावसाचे निकष पूर्ण केले नाही तरी फारसा फरक पडत नाही. सर्व मानके दररोज पूर्ण होतील अशी अपेक्षा केली जाऊ शकत नाही. मात्र, हवामान खात्याचा निर्णय तज्ज्ञांना मान्य नाही.