औद्योगिक वसाहतीसाठी जागेचे सर्वेक्षण होणार-आ.कांदे

औद्योगिक वसाहतीसाठी जागेचे सर्वेक्षण होणार-आ.कांदे

मनमाड । प्रतिनिधी Manmad

गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला औद्योगिक वसाहतीचा( Industrial Estate) प्रश्न कायमस्वरुपी सुटावा यासाठी आ. सुहास कांदे( MLA Suhas Kande) यांनी केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले असून औद्योगिकमंत्री उदय सामंत यांनी मुंबई मंत्रालयात अधिकार्‍यांसोबत बैठक घेतली. त्यात एमआयडीसीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांसोबत बैठक घेतली.

त्यात लवकरात लवकर औद्योगिक वसाहतीच्या कामाला कशी सुरुवात करता येईल याबाबत सविस्तर चर्चा झाली असून सुमारे एक हजार एकर जागा एमआयडीसीसाठी लागणार आहे. त्याचा पहिला सर्वे झाला. दुसरा सर्वे करण्यासाठी वरिष्ठ अधिकारी पुढच्या आठवड्यात येणार असल्याची माहिती आ. सुहास कांदे यांनी दिली. शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरुपी सुटावा आणि शहरातील बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळावे हे माझे स्वप्न असून ते पूर्ण करण्यासाठी मी झटत असल्याचे आ. कांदे यांनी सांगितले.

नाशिक जिल्ह्यात मालेगावनंतर मनमाड एकमेव मोठे शहर असून भुसावळ विभागात रेल्वेचे मोठे जंक्शन, रेल्वेचे ब्रीज तयार करण्यासाठी लागणारे साहित्य बनवणारा ब्रिटीशकालीन रेल्वेचा वर्कशॉप, भारत पेट्रोलियम, इंडियन ऑईल आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कंपन्यांचे इंधन डेपो, शहरातून जाणारा पुणे-इंदोर महामार्ग इत्यादींमुळे देशाच्या नकाशावर शहराची आगळीवेगळी ओळख आहे.

मात्र पाणीटंचाईचे माहेरघर आणि बेरोजगारांची मोठी संख्या असलेले शहर म्हणूनदेखील या शहराला ओळखले जाते. इतर शहारांप्रमाणे येथेही अन्य समस्या आहेत. मात्र पाणीटंचाई आणि बेरोजगारी या दोन मुख्य समस्या असल्यामुळे या दोन समस्या कायमस्वरुपी सोडवण्याचा आपण चंग बांधला होता, असे आ. कांदे यांनी सांगून पाणी समस्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले.त्यात यश आले आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 315 कोटींची करंजवण पाणीपुरवठा योजना केवळ मंजूरच केली नाही तर त्यासाठी निधीची तरतूददेखील केली.

पाणीपुरवठा योजनेची निविदा प्रसिद्ध झाली असून लवकरच तिचे भूमिपूजन होणार आहे. पाणी समस्या मार्गी लागल्यानंतर मी माझे लक्ष औद्योगिक वसाहतीकडे केंद्रित केले. त्यासाठी सतत पाठपुरवा करत राहिलो. त्यालाही यश आले असून औद्योगिकमंत्री उदय सामंत यांनी मुंबई मंत्रालयात एमआयडीसीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांसोबत बैठक घेतली. त्यात पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. सचिनकुमार पटेलदेखील उपस्थित होते. बेरोजगारीमुळे अनेक सुशिक्षित तरुण व्यसनाच्या आहारी गेले असून अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. अनेक तरुणांना तुटपुंज्या पगारावर बाहेरगावी जाऊन काम करावे लागत आहे. जर मनमाडला एमआयडीसी झाली तर तरुणांच्या हाताला काम मिळेल. या शहराचा कायापालट होऊन आर्थिक उलाढालदेखील वाढेल, असेही आ. कांदे यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com