
सिन्नर | प्रतिनिधी | Sineer
अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनला (Actress Aishwarya Rai-Bachchan) सिन्नरच्या (Sinner) तहसिलदारांनी नोटीस बजावल्याने सर्वत्र चर्चा होत आहे. ऐश्वर्या राय-बच्चनची सिन्नरच्या पश्चिम पट्ट्यातील डोंगराळ भागात जमीन (Land)असून त्याचा कर न भरल्याने ही नोटीस बजावण्यात आली आहे...
याबाबत अधिक माहिती अशी की, ऐश्वर्या राय-बच्चनची सिन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात असलेल्या ठाणगाव (Thangaon) जवळील आडवाडीच्या डोंगराळ भागात १ हेक्टर २२ आर जमीन आहे. तिने त्या जमिनीचा एका वर्षाचा कर भरलेला नाही. त्या वर्षभराच्या कराची २१ हजार ९७० रुपयांची थकबाकी असल्याने तिला थकबाकी (Arrears) भरण्यासाठी ही नोटीस बजावण्यात आली आहे.
तसेच ऐश्वर्या राय-बच्चनसह १२०० अकृषक मालमत्ता धारकांना या नोटीसा देण्यात आलेल्या आहेत. यामध्ये अनेक छोट्या मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे. मात्र, ऐश्वर्या राय-बच्चनचे नाव समोर आल्याने हा चर्चेचा विषय बनला आहे. ऐश्वर्या राय-बच्चने याठिकाणी नेमकी कोणत्या उद्देशाने जमीन घेतली होती याचे कारण मात्र, गुलदस्त्यात असून सुझलॉन पवन ऊर्जा निर्मिती करणाऱ्या कंपनीत गुंतवणूक केली असल्याची चर्चा आहे.
दरम्यान, शासकीय नियमानुसार थकीत कराच्या वसुलीसाठी एक ते चार या नमुन्याप्रमाणे नोटिसा पाठवल्या जातात. शेवटच्या टप्प्यात मालमत्ता धारकाने नोटिसांना उत्तर देऊन कर भरला नाही तर या उताऱ्यांवर महाराष्ट्र शासनाचे नाव लावले जाते अशी माहिती प्रशासनाकडून मिळाली आहे. तसेच आता ऐश्वर्या राय-बच्चन नोटीस बजावल्यानंतर या नोटिशीला काय उत्तर देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.