सहा विभागांत एकाचवेळी अतिक्रमण हटाव मोहीम

अतिरिक्त आयुक्त डहाळे यांची माहिती; जेहान सर्कलपासून सुरुवात
सहा विभागांत एकाचवेळी अतिक्रमण हटाव मोहीम

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक महापालिका आयुक्त तथा प्रशासक म्हणून कार्यभार स्वीकारल्यापासून रमेश पवार ( NMC Commissioner Ramesh Pawar ) यांनी शहर स्वच्छता तसेच सौंदर्यकरण यावर विशेष भर देताना अतिक्रमण मुक्त शहर (Encroachment free city )करण्याकडे विशेष लक्ष दिले आहे. याची सुरुवात त्यांनी गंगाघाट परिसरातून केली आहे. हीच मोहीम अता शहरभर येणार आहे. यासाठी शहरातील महापालिकेच्या सहाही विभागांची एकत्रित धडक मोहीम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त तथा अतिक्रमण विभाग प्रमुख करुणा डहाळे यांनी दिली आहे.

आयुक्त तथा प्रशासक पवार रुजू झाले होते, त्यावेळी त्यांनी थेट रिक्षाने सुमारे तीन तास नाशिक शहरातील विविध भागात जाऊन प्रत्यक्ष पाहणी दौरा केला होता. गंगाघाट, रामकुंड तसेच पंचवटी भागातील हातगाड्या तसेच बेशिस्त हॉकर्सची पाहणी करून प्रशासनाला महत्वाच्या सूचना केल्या होत्या.

आयुक्तांच्या दौर्‍यानंतर महापालिका अतिक्रमण विभाग अ‍ॅक्शन मोडवर येऊन गंगाघाट परिसरात मोहीम राबविण्यात येऊन संपूर्ण परिसर अतिक्रमण मुक्त केला. त्याठिकाणी फक्त पूजा साहित्य विक्रेत्यांना परवानगी दिली असून इतर खाद्यपदार्थ तसेच साहित्य विक्री करणार्‍यांनी दुकाने थाटली तर थेट जप्तीची कारवाई होत आहे. तर या ठिकाणी महापालिकेचे पथक कायम असून अतिक्रमण करणार्‍यांवर कठोर कारवाई होत आहे.

6 विभागात संयुक्त कारवाई

नाशिक महापालिकेच्या नाशिकरोड, पंचवटी, सातपूर, नाशिक पश्चिम, नाशिक पूर्व तसेच नवीन नाशिक या सहा विभागांमध्ये एकाच वेळी संयुक्त मोहीम हाती घेण्यात येणार आहे. यासाठी सर्व ठिकाणांच्या गाड्या, जेसीबी मशीन तसेच अधिकारी व सेवकांचा ताफा वापरण्यात येणार आहे. दरम्यान या अतिक्रमण मोहिमेची सुरुवात गंगापूर रोडवरून करण्यात येणार आहे. यानंतर हळूहळू शहरभर ही मोहीम सुरूच राहणार आहे. यासाठी विशेष पोलीस बंदोबस्त मिळावा, अशी मागणी देखील महापालिकेच्या वतीने पोलीस दलाकडे करण्यात आली आहे.

फोन येणार नाही

नाशिक शहराचा झपाट्याने विकास झाला आहे तर दुसरीकडे वाहनांची संख्या देखील रस्त्यांवर वाढली आहे. त्याचबरोबर शहरात सर्व भागांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले आहे. सध्या नाशिक महापालिकेत प्रशासक राजवट सुरू असल्यामुळे अतिक्रमण कारवाई हाती घेतल्यावर कोणत्याही प्रकारचे फोन येणार नाही, अशी चर्चा आहे.

गंगाघाट परिसरात आता कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण होत नाही, त्या ठिकाणी 24 तास सुरक्षारक्षक नेमण्यात आले आहे. आता शहरातील सर्व विभागांची एकत्रित संयुक्त अतिक्रमण मोहीम हाती घेण्यात येणार आहे. त्याची सुरुवात जेहान सर्कलपासून होणार आहे.

- करुणा डहाळे, अति. आयुक्त तथा अतिक्रमण उपायुक्त

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com