
नाशिक । वैभव कातकाडे Nashik
जिल्ह्यावर पाणीटंचाईचे सावट (Water scarcity) वाढत असल्याची चिन्हे आहे.शहराला पाणीपुरवठा करणारे महत्वाचे धरण असलेले गंगापूर धरण( Gangapur Dam) समुहात अवघा 22% पाणी साठा आहे. जून महिना संपून आता जुलै महिना सुरु झाला आहे. तरीदेखील वरूणराजा कोसळला नाही. त्यामुळे शेतकरी तसेच सर्वच नागरिकांचे लक्ष पावसाकडे लागले आहे.
पाऊस जर असाच लांबला तर पाणी टिकविणे मोठे आव्हान ठरणार आहे. दरम्यान, जिल्ह्यातील 24 पैकी नऊ धरणांमध्ये गेल्या वर्षीपेक्षाही कमी पाणीसाठा आहे. यंदाचा उन्हाळा असह्य होता. उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या होत्या. अजूनही पाण्याची मागणी वाढल्याने धरणांमधील उपयुक्त पाणीसाठा कमी होत आहे.
जिल्ह्यात मध्यम आणि मोठ्या आकाराची एकूण 24 धरणे असून, 65 हज़ार 664 दशलक्ष घनफूट एवढी या धरणांची पाणीसाठवण क्षमता आहे. गेल्या वर्षी 1 जुलैला या धरणांत 17 हजार 923 दशलक्ष घनफूट म्हणजेच 27 टक्के उपयुक्त पाणी शिल्लक होते. यंदा जवळपास तेवढेच 15 हजार 327 दशलक्ष घनफूट अर्थात 23 टक्के पाणी उपलब्ध आहे. पाऊस लांबल्यामुळे पिकपेरणीचे संकट शेतकर्यांवर आहे.
गंगापूरमध्ये 27 टक्के पाणीसाठा
गंगापूर धरणात 27 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. या धरणसमूहात गेल्या वर्षी 26 टक्के उपयुक्त पाणीसाठा होता. यंदा हा पाणीसाठा 22 टक्के आहे. गंगापूर धरणसमूहामध्ये गंगापूर, कश्यपी, गौतमी गोदावरी आणि आळंदी या चार धरणांचा समावेश होतो. दारणा आणि मुकणे या धरणांमधील पाण्याचा शहरवासीयांना उपयोग होत असतो. या दोन्ही धरणांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत पाणीसाठा यंदा कमी आहे.