Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याधक्क्यांवर धक्के! फिका जल्लोष!

धक्क्यांवर धक्के! फिका जल्लोष!

नाशिक । विशेष प्रतिनिधी Nashik

गेल्या आठवड्यापासून महाराष्ट्राचे राजकारण ( Political Movements in Maharashtra ) अनेक नागमोडी वळणे घेत आहे. शिवसेनेतील बंडखोरीने (Rebellion in Shiv Sena) ग्रासलेले महाविकास आघाडीचे सरकार ( Mahavikas Aaghadi Government ) कोसळल्यानंतर लगोलग भाजपच्या पाठिंब्याने बंडखोर गटाच्या नेतृत्वात पर्यायी शिंदे सरकार स्थापन झाले.

- Advertisement -

मात्र हे सरकार स्थापन होत असताना गुरुवारचा दिवस महाराष्ट्राच्या राजकारणाला नवे वळण देणारा ठरला. सर्वच पक्षांना, विशेषतः शिवसेना आणि भाजपला हा दिवस धक्क्यांमागून धक्के देणारा ठरला. भाजप गोटात शांतता पसरली. मात्र त्यातून सावरत काही नेत्यांनी फडणवीसांवर स्तुतीसुमने उधळली. भाजपच्या मुंबई कार्यालयात सत्ता स्थापनेचा विजयी जल्लोष साजरा झाला. मात्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्षांसह इतर काही प्रमुख नेत्यांनी यावेळी दांडी मारली. त्यामुळे महाराष्ट्र भाजपतसुद्धा सर्व काही आलबेल नसल्याचे उघड झाले. फडणवीस मुख्यमंत्री न झाल्याने विजयी जल्लोष फिका पडला.

राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा केल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेला देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी संबोधित केले. फडणवीस मुख्यमंत्री आणि शिंदे उपमुख्यमंत्री होणार हे गृहीत असताना फडणवीस यांनी शिंदे मुख्यमंत्री होतील, अशी घोषणा करून सर्वांनाआश्चर्याचा धक्का दिला.

आपण सरकारमध्ये सहभागी होणार नाही, असे त्यांनी ठासून सांगितले. मात्र दोन तासानंतर दिल्लीहून भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी उपमुख्यमंत्री म्हणून फडणवीस शपथ घेतील, अशी घोषणा केली. पाठोपाठ पक्षनेते अमित शहा यांनीही ’ट्वीट’ करून त्यास दुजोरा देताना फडणवीस उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचे जाहीर करून फडणवीसांना चकित केले. या निर्णयाने आधी शिंदे आणि नंतर फडणवीससुद्धा गडबडले. शिवसेनेला धक्का देताना भाजप श्रेष्ठींनी महाराष्ट्रातील भाजप नेते, कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असलेल्या फडणवीस आणि त्यांच्या समर्थकांनाही चकवले. बिहार आणि गोवा विधानसभा निवडणुकीची जबाबदारी भाजपने फडणवीसांवर टाकली होती. ती त्यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

पक्षाची सत्ता आणण्यात त्यांनी बहुमोल योगदान दिले. महाविकास आघाडीला रोखण्याचे काम केले. राज्यात अलीकडेच झालेल्या राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत पुरेसे संख्याबळ नसताना सत्ताधारी आघाडीची मते फोडून अधिकच्या दोन जागा पक्षाला जिंकून दिल्या. त्यानंतर शिवसेनेत झालेल्या किंबहुना जाणीवपूर्वक घडवल्या गेलेल्या बंडखोरीतील बंडखोरांचे व्यवस्थापन फडणवीसांनी केल्याचे सुरत, बडोदा आदी ठिकाणी शिंदे यांच्यासोबत त्यांच्या गुप्त भेटी झाल्याचा गाजावाजा माध्यमांतून झाल्यानंतर लपून राहिले नाही.

दरम्यानच्या काळात फडणवीसांच्या झालेल्या दिल्ली वार्‍याही बोलक्या होत्या. शिवसेनेतील बंडखोरी, बंडखोरांची बडदास्त आणि त्यानंतरच्या सत्तांतरामागे दिल्लीतील भाजप नेतृत्वाचा हात असल्याचेही आता स्पष्ट झाले आहे. तथापि राज्यात त्यासाठी फडणवीस यांनी दिलेले योगदान नजरेआड करता येणारे नाही.

या सर्व कामांबद्दल ते नुकत्याच स्थापन झालेल्या सरकारच्या नेतृत्वासाठी पहिले दावेदार होते, पण त्यांना डावलून भाजप नेतृत्वाने आगामी काळातील मुंबई मनपा निवडणुकीसह अन्य निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून आणि शिवसेना कमकुवत करण्यासाठी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद देऊन बळ दिले. त्यात फडणवीसांचा मुख्यामंत्रीपदाचा दावा मागे पडला. पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार त्यांना शिंदे यांच्या नावाची मुख्यामंत्रीपदासाठी घोषणा करावी लागली.

आपण सरकारबाहेर राहून सरकारला मदत करू, असे सांगून ’किंगमेकर’च्या भूमिकेत शिरलेल्या फडणवीस यांना नंतर उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन पक्षादेशाचे पालन करावे लागले. बंडखोर गटाच्या नेत्याकडे सरकारची धुरा सोपवून भाजप श्रेष्ठींनी एका बाणात अनेक निशाणे साधले असले तरी त्यात फडणवीसदेखील घायाळ झाले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या