
घोटी | जाकीर शेख Ghoti
इगतपुरी तालुक्यातील( Igatpuri) वाडीवऱ्हे ( Vadivarhe)परिसरातील सांबरवाडी ( गणेश वाडी ) येथे विवाहित महिलेचा निर्घृण खून झाला आहे. दारू पिण्यासाठी बायकोने ५० रुपये दिले नाही म्हणून राग आल्याने दारुड्या नवऱ्याने लोखंडी रॉड बायकोच्या डोक्यात मारून बायकोचा निर्घृण खून केला आहे. याबाबत वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात (Vadivarhe Police Station )मयताचा मुलगा राकेश मोरे याने फिर्याद दिली आहे.
या घटने बाबत वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात भादवी कलम ३०२,५०४ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल केला असून दारुड्या नवऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून वाडीवऱ्हे पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक बिपीन शेवाळे यांनी तात्काळ कर्मचारी सोमनाथ बोराडे, निलेश मराठे, गायकवाड, पवार, चौधरी या कर्मचाऱ्यांसोबत घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले. घटनेचे गांभीर्य पाहुन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले यांनीही घटनास्थळी भेट देत तपास कामी सूचना केल्या. पुढील तपास वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बिपिन शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वाडीवऱ्हे पोलीस पथक करत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, ता. इगतपुरी तालुक्यातील वाडीवऱ्हे परिसरामध्ये असलेली सांबरवाडी ( गणेशवाडी ) येथील लालू सोपान मोरे हा आपल्या बायको, मुलगा व सुन यांच्या सोबत राहतो. त्याचा मुलगा राकेश सोपान मोरे, वय २३ वर्ष हा मासे विक्रीचा व्यवसाय करतो. त्याने वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, काल रात्री वडील लालू सोपान मोरे हा दारू पिऊन घरी आला होता. बायको मीराबाई हिच्याकडे तो ५० रुपये पुन्हा पुन्हा दारू पिण्यासाठी मागत होता. मात्र तिने नकार देताच त्याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. काही वेळानंतर तो घरातून निघून गेला. मग आम्ही सर्व जणांनी जेवण केले. मुलगा राकेश व सून बाहेर पडवीत झोपण्यासाठी गेले असता आई घरात एकटीच झोपी गेली होती. त्यानंतर रात्री साडेनऊ ते दहाच्या दरम्यान वडील लालू सोपान मोरे हा घरी आल्यानंतर त्याने आतून दरवाजा लावून घेतला.
पैसे न दिल्याचा राग मनात धरून त्याने पत्नी मिराबाई लालू मोरे वय ४५ हिला मारहाण करू लागला. मुसळ म्हणून वापर करीत असलेल्या लोखंडी रॉडने लालू मोरे याने तिच्या डोक्यावर, तोंडावर जोरदार प्रहार केले. यामुळे ती रक्ताच्या थारोळ्यात पडली. घोंगाट ऐकून मुलगा व सून दरवाजा वाजवू लागले.
काही वेळाने लालू याने स्वतःच दरवाजा उघडून मुलाला म्हणाला की मी तुझ्या आईला मारून टाकले आहे. तुला काय करायचे ते कर. राकेश याने वेळ न दवडता १०८ नंबरला कॉल करून रुग्णवाहीका बोलावून घेतली. रुग्णवाहीके मधील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मीराबाई हिला मृत घोषित केले. याबाबत त्यांनी तात्काळ वाडीवऱ्हे पोलिसांशी संपर्क साधला.