राहुल शेवाळेंच्या गटनेतेपदावर विनायक राऊतांचा आक्षेप; म्हणाले…

jalgaon-digital
3 Min Read

नवी दिल्ली । New Delhi

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या आमदारांनी (Shivsena MLA) केलेल्या बंडानंतर शिवसेनेला लागलेली गळती अद्याप सुरू असून सेनेच्या आमदारांपाठोपाठ लोकसभेतील १२ खासदारांचा (MP) गटही शिंदे गटात (Shinde Group) दाखल झाला आहे. या गटाने राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांना आपले गटनेते आणि भावना गवळी (Bhavna Gawli) यांना आपल्या प्रतोद म्हणून नियुक्त करण्याची विनंती लोकसभा अध्यक्षांकडे (Speaker of Lok Sabha) केली होती. त्यानंतर या नियुक्तीला मान्यताही मिळाली होती. मात्र आता शिवसेनेचे खासदार विनायक राऊत (MP Vinayak Raut) यांनी राहुल शेवाळे यांच्या गटनेतेपदी झालेल्या नियुक्तीवर आक्षेप घेतला आहे…

यावेळी विनायक राऊत म्हणाले की, शिवसेनेच्या बंडखोर (Rebel) गटाने १९ जुलैला राहुल शेवाळेंच्या गटनेतेपदाबाबत मागणी केली होती. मात्र लोकसभा अध्यक्षांनी १८ जुलैलाच हा निर्णय घेतला. त्यामुळे बंडखोरांना निवडण्याचा निर्णय आधीच झाला होता, असा आरोप विनायक राऊत यांनी केला. तसेच लोकसभा अध्यक्षांनी आमच्या पत्राची दखल न घेता, नैसर्गिक न्यायाचे तत्व न पाळता निर्णय घेतल्याचेही राऊत यांनी म्हटले.

ते पुढे म्हणाले की, आम्ही ६ जुलैलाच लोकसभा अध्यक्ष आणि संसदीय कामकाज मंत्र्यांना पत्र दिले होते. त्यानंतर १८ जुलैला रात्री साडेआठ वाजता लोकसभा अध्यक्षांच्या घरी जाऊन शिवसेनेच्या गटनेतेपदावर (ShivSena group leader) कुणी दावा केल्यास आम्हाला आमचे म्हणणे मांडण्याची संधी द्या अशी मागणी केली. पुन्हा १९ जुलैला समक्ष भेटून लोकसभा अध्यक्षांना त्याबाबत पत्र दिले. मात्र, त्यांनी आमच्या पत्रांची दखल न घेता अचानक लोकसभेतील शिवसेना गटनेते बदलले आहेत. राहुल शेवाळे यांचे नाव लोकसभा संकेतस्थळावर दाखवले जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

पुढे ते म्हणाले की, लोकसभा संकेतस्थळावर (Lok Sabha website) २० जुलैला पत्र आले. तर आमच्या हातात १९ जुलैला पत्र आले. परंतु प्रत्यक्षात लोकसभेतील गटनेत्यांची यादी १८ जुलैची आहे. माझ्या माहितीनुसार एकनाथ शिंदे गटाचे खासदार लोकसभा अध्यक्षांना १९ जुलैला भेटले आणि पत्र दिले,असे असताना लोकसभा अध्यक्षांनी अगोदरच १८ जुलैलाच हा निर्णय घेऊन ठेवला होता. लोकसभा सचिवालयाने १९ जुलैला पत्र काढले आणि हा निर्णय १८ जुलैपासून लागू असल्याचे विनायक राऊत यांनी सांगितले.

राऊत पुढे म्हणाले की, लोकसभा सचिवालयाचे (Lok Sabha Secretariat) हे कृत्य कोणत्या नियमाला धरून आहे याचे आम्हाला आकलन झालेले नाही. त्यांना कोणताही नैसर्गिक न्याय नसून आमच्या पत्राची दखल न घेता बंडखोर गटाचा गटनेता त्यांना बनवायचा होता असा आरोप शिवसेना नेते विनायक राऊत यांनी केला आहे. तसेच याप्रकरणी लोकसभा अध्यक्षांना जाब विचारणार असून सर्वोच्च न्यायालयातही (Supreme Court) दाद मागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *