'त्यांच्या पोटातील मळमळ ओठावर'; राऊतांचा चंद्रकांत पाटलांना टोला

'त्यांच्या पोटातील मळमळ ओठावर'; राऊतांचा  चंद्रकांत पाटलांना टोला

मुंबई । Mumbai

'आम्ही सर्वांनी मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना मुख्यमंत्री केले आहे. शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय केंद्रीय नेतृत्वाने घेतला आहे. परंतु या निर्णयामुळे मला दुःख झाले,’ असे मत चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी काल भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत व्यक्त केले होते. पाटील यांच्या या वक्तव्याची व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात त्याचे पडसाद उमटत असून या वक्तव्यावर शिवसेना (Shivsena) प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे...

यावेळी राऊत म्हणाले की, भाजपमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य (freedom of expression) नाही. तिथे मनमोकळेपणाने मत व्यक्त करता येत नाही. तरीही मी चंद्रकांत पाटील यांचे अभिनंदन करतो, त्यांनी थोडा काळ कोल्हापुरचे पाणी दाखवले. जे त्यांच्या पोटात मळमळत होते, ते ओठावर आले. ही भाजपाच्या कार्यकर्त्यांची भावना आहे, असा खुलासाही त्यांना करावा लागला. त्या भावनेचा आदर व्हायला हवा होता. असे म्हणत चंद्रकांत पाटलांना टोला लगावला आहे.

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांच्या या भाषणाचा व्हिडीओ भाजपाने सोशल मीडियावरुन (Social Media) तातडीने काढून टाकला आहे. तसेच एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केल्याने दु:ख झाले हे प्रदेशाध्यक्षांचे मत नाही़ त्यावेळच्या घडामोडी व प्रसंगाबाबत कार्यकर्त्यांच्या मनातील भावार्थ प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला अशी सारवासारव भाजपा नेते अ‍ॅड. आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com