
मुंबई | Mumbai
मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (Mumbai Police) आयएनएस ‘विक्रांत’निधी अपहार प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांना क्लीन चिट दिली आहे.
तर दुसरीकडे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्यासह भाजप नेत्यांकडून महापुरुषांच्या झालेल्या अवमानाच्या निषेधार्थ १७ डिसेंबर रोजी मुंबईत विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. पंरतु, या मोर्चाला अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. त्यानंतर आता यासह विविध मुद्यांवर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाष्य केले आहे.
यावेळी सोमय्या यांच्या क्लिनचिटवर बोलतांना राऊत म्हणाले की, सरकार बदलल्यानंतर ज्या अनेक गोष्टी अपेक्षित असतात, त्यातीलच आयएनएसची गोष्ट आहे. याचा अर्थ तो विषय संपलेला नाही. आयएनएससाठी पैसे गोळा झाल्याचे सर्वांनी पाहिले आहे. मग तो एक रुपया असेल किंवा ५० कोटी असतील. पैशांचा अपहार झालाच आहे. त्यामुळे राज्याच्या गृहमंत्र्यांना हा प्रश्न विचारायला हवा, असे त्यांनी म्हटले आहे.
पुढे ते म्हणाले की, आमच्या लोकांना क्लीन चिट मिळणार नाही. परंतु,आज जरी किरीट सोमय्या (Kirit Somayya) यांना क्लीन चिट मिळाली असली तरी २०२४ ला हे प्रकरण समोर येणार नाही असे नाही. कोणतेही सरकार हे कायमस्वरुपी नसते. सरकार बदलले की सर्वांचा हिशोब पूर्ण केला जाईल, असा इशारा देत याप्रकरणी केंद्राला पत्र लिहिणार असल्याचे राऊतांनी सांगितले.
तसेच ते पुढे म्हणाले की, या देशात अद्याप अधिकृतपणे हुकूमशाहीची घोषणा झालेली नाही. लोकशाही मार्गाने केलेल्या आंदोलनात सरकार आडकाठी आणू शकत नाही. त्यामुळे १७ तारखेच्या महामोर्चाला (Mahamorcha) सरकार थांबवू शकणार नाही, असा इशाराच संजय राऊतांनी दिला आहे.