शिंदे गट धनुष्यबाणाची करू शकतो मागणी

शिंदे गट धनुष्यबाणाची करू शकतो मागणी

मुंबई । Mumbai

शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी बंडखोरी करत शिवसनेला (shivsena) मोठे खिंडार पाडले आहे. शिंदे यांनी आपल्यासोबत ४२ आमदार असल्याचा दावा केला आहे. शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे निम्मे आमदार असल्याने त्यांना भाजपसोबत सत्ता स्थापनेची मोठी संधी आहे. अशातच एकनाथ शिंदे शिवसेनेच्या धनुष्यबाण (dhanushyaban) या चिन्हावर आपला हक्क दाखवू शकतात का? यावर बरेच तर्कवितर्क लढवले जात आहेत...

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेनेचा 'धनुष्यबाण' मिळवण्यासाठी शिंदे हे कायदेशीर लढाई लढवतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच शिंदे यांनी विधिमंडळ गटनेता, पक्ष प्रतोद आणि पक्षांतरबंदी कायद्यानुसार हवे असलेले दोनतृतीयांश संख्याबळ या तांत्रिक मुद्द्यावर पूर्ण केले असून शिंदे गटाची बाजू कायद्याच्या कसोटीवर टिकेल, असे मत तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.

दुसरीकडे आपला गट हीच खरी शिवसेना असा दावा एकनाथ शिंदे विधानसभा उपाध्यक्ष (Assembly Vice President) नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांना पत्र पाठवून करणार असल्याची माहितीही समोर आली आहे. तर शिवसेनेचे दोन तृतीयांश आमदार शिंदेंच्या गोटात असल्याने 'मूळ पक्ष' म्हणून दर्जा मिळवण्याचेही एकनाथ शिंदेंचे प्रयत्न असल्याची माहिती समोर आली आहे. यासाठी भाजपची कायदे मंडळी कामाला लागल्याचे बोलले जात आहे.

काय आहे कायदेशीर प्रक्रिया?

एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेनेच्या ५५ आमदारांपैकी ३७ आमदार असावे लागतील. तर त्यांच्या गटाला मान्यता मिळेल. त्यामुळे केवळ शिवसेनेच्या ३७ आमदारांचा पाठिंबा ते मिळवत आहेत. पण विधानसभेतील फ्लोअर टेस्ट मध्ये त्यांच्यासोबत सेनेचे ३७ आमदार पलटता कामा नयेत, याची खबरदारी त्यांना घ्यावी लागेल. त्यानंतर गटनेता बदलण्याची खेळी ते शिवसेनेवर उलटवतील. कारण निवडून आलेले आमदार बहुमताने गटनेता निवडून देतात.

शिंदे गट आमचा आघाडी सरकारला पाठिंबा नाही, असे पत्र राज्यपालांना देईल, तेव्हा राज्यपाल हे विद्यमान ठाकरे सरकारला विश्वासदर्शक ठराव मंजूर करण्याचे आदेश देतील. जर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा न देता विश्वासदर्शक ठरावाला सामोरे गेले तर शिंदेंच्या गटाच्या किमान ३७ आमदारांना सरकारविरोधात मतदान करावे लागेल. जर कमी आमदारांनी सरकारविरोधात मतदान केले तर शिवसेना पक्षांतरबंदी कायद्यानुसार शिंदे गटाच्या आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी करतील. त्यामुळे जोपर्यंत शिंदे यांच्या गटात शिवसेनेचे ३७ आमदार येत नाहीत, तोपर्यंत त्यांचे पत्र राज्यपालांकडे पाठविणार नाहीत, असे तज्ञांचे मत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com