आता खूप झालं,महाराष्ट्रद्रोह्यांना...; उद्धव ठाकरे कडाडले

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई | Mumbai

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत व कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Karnataka CM Basavaraj Bommai) यांनी सीमाभागातील काही भागावर दावा केल्यावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यानंतर आता ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेत राज्यपाल कोश्यारी आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांच्यावर निशाणा साधला आहे...

यावेळी ठाकरे म्हणाले की, गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात ( Maharashtra)खोके सरकार किंवा मिंधे सरकार आल्यानंतर राज्याची सातत्याने अवहेलना होत आहे. आज अचानक कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या अंगात भूत संचारलं. जणूकाही महाराष्ट्रात माणसं राहातच नाहीत. महाराष्ट्राला स्वाभिमान, अस्मिता, हिंमत काहीच नाही. कुणीही यावं, टपलीत मारावं आणि आम्ही छत्रपती शिवाजी महाराज (Chatrapati Shivaji Maharaj) की जय म्हणून गप्प बसावं, हे आता खूप झालं. महाराष्ट्र शिवाजी महाराजांना मानतोच हे काही वेगळं सांगायची गरज नाही. त्यांचा अपमान झाल्यानंतर गुळमुळीत प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. ज्यांनी महाराजांचा अपमान केला, त्यांच्याच पक्षातल्या नेत्यांकडून दिल्या जात आहेत, असे ठाकरे यांनी म्हटले आहे.

पुढे ते म्हणाले की, केंद्रात ज्यांचे सरकार असते त्यांची किंवा त्यांच्या विचारसरणीची लोकं राज्यपाल म्हणून नियुक्त केले जातात. मात्र आता ज्यांना वृद्धाश्रमातही जागा नाही त्यांना राज्यपालपदी नियुक्त केले जातंय का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे आता राज्यपाल नियुक्तीचे निकषसुद्धा ठरवले पाहिजेत. राज्यपाल निपक्ष असायला हवेत. राज्यातील पेचप्रसंग सोडण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते. राज्यपाल जे बोलतात ते गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. मात्र राज्यपाल काहीही बोलतील हे महाराष्ट्र मान्य करणार नाही, असेही ठाकरे म्हणाले.

तसेच राज्यपालांनी शिवरायांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा फक्त निषेध करुन चालणार नाही. तर महाराष्ट्रद्रोह्यांना विरोध करण्यासाठी महाराष्ट्रप्रेमींनी एकत्र आले पाहिजे. त्यामुळे सर्वांना एकत्र येण्याचे आवाहन करतो.महाराष्ट्रात एक राज्यव्यापी भूमिका घेण्याची गरज असून केंद्राने पाठवलेल्या या सॅम्पलला पुन्हा बोलवून घ्या किंवा एखाद्या वृद्धाश्रमात (Old Age Home) पाठवा. सध्या कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र ही कल्पनाही करता येत नाही, असेही ठाकरेंनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com