Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याशिवभोजन थाळी मिळणार पाच रुपयातच

शिवभोजन थाळी मिळणार पाच रुपयातच

नाशिक । प्रतिनिधी

करोना संकटात गोरगरिबांसाठी मोठा दिलासा ठरलेली शिवभोजन थाळी अन्न पुरवठा मंत्रालयाकडून पुढील आदेश येईपर्यंत पाच रुपयातच मिळणार आहे. राज्यात पुन्हा लॉकडाऊनची चिन्हे बघता गोरगरिबांसाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे.

- Advertisement -

गोरगरिबांना अल्प दरात भोजन मिळावे, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून महाविकास आघाडीने दहा रुपयात शिवभोजन थाळी सुरू केली. मजूर, हातावर पोट असलेले, शासकीय कार्यालयात विविध कामकाजानिमित्त दुरुन येणारे नागरिक, विद्यार्थी यांना या शिवभोजन थाळीचा मोठा आधार मिळाला.

अवघ्या दहा रुपयांत पोट भरेल इतके जेवण मिळाल्याने या थाळीला दिवसेंदिवस मागणी वाढत होती. त्यात करोना संकट आले व लॉकडाऊन जारी झाला. सर्व काही ठप्प झाल्याने गोरगरिबांचे मोठे हाल झाले होते. ते बघता उपासमार होऊ नये, यासाठी शिवभोजन थाळीचा दर कमी करून पाच रुपयात ती उपलब्ध करुन देण्यात आली.

लॉकडाऊन काळात हजारोंची भूक शिवभोजन थाळीने भागवली. मार्चअखेरपर्यंत थाळीचा दर पाच रुपये ठेवण्यात आला होता. 1 एप्रिलपासून शिवभोजन थाळीचे दर पूर्ववत म्हणजे दहा रुपये इतके केले जाणार होते. मात्र, करोनामुळे बिघडलेली परिस्थिती अजुनही पूर्वपदावर आलेली नाही. त्यामुळे थाळीचे दर पूर्ववत करण्याचे आदेश अन्न पुरवठा मंत्रालयाने जारी केले नाही. त्यामुळे पुढील आदेश येईपर्यंत पाच रुपये किमतीनेच शिवभोजन थाळीची विक्री केली जाणार आहे.

17 लाख नागरिकांनी घेतला शिवभोजनचा आस्वाद

जिल्ह्यात 45 शिवभोजन केंद्र कार्यरत आहे. त्यापैकी नाशिक शहरात 14 व ग्रामीण भागात 31 शिवभोजन केंद्र आहेत. दिवसाला शहरातील केंद्रासाठी 3 हजार 700 थाळ्या तर उर्वरित ग्रामीण भागातील केंद्रांसाठी 3 हजार 300 थाळ्या मंजूर आहेत. सध्यस्थितीत शहर व जिल्हा मिळून 6 हजार 500 हून अधिक शिवभोजन थाळ्यांचे वितरण होत आहे. मागील एक वर्षात 17 लाख 53 हजारांहून अधिक नागरिकांनी शिवभोजनचा आस्वाद घेतला आहे.

मार्चअखेरपर्यंत पाच रुपये दराने शिवभोजन थाळीची विक्री करावी, असे शासन आदेश होते. पुढील आदेश येईपर्यंत पाच रुपये दरानेच थाळी विक्री केली जाईल.

डॉ. अरविंद नरसीकर, जिल्हा पुरवठा अधिकारी

- Advertisment -

ताज्या बातम्या