Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्या14 जूनपर्यंत शिवभोजन मोफत

14 जूनपर्यंत शिवभोजन मोफत

मुंबई । प्रतिनिधी

राज्यात सुरू असलेल्या ब्रेक द चेन या अभियानांतर्गत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील विविध समाजघटकांसाठी मदतीचे जे पॅकेज घोषित केले होते. त्यामध्ये राज्यातील गरीब आणि गरजू लोकांना 15 एप्रिलपासून पुढे एक महिन्यासाठी शिवभोजन थाळी अंतर्गत मोफत जेवणाची व्यवस्था उपलब्ध करून दिली होती. ही मुदत आता आणखी एका महिन्यासाठी वाढवण्यात आली असून राज्यातील गरीब जनतेला 14 जूनपर्यंत या योजनेंतर्गत मोफत जेवणाची सुविधा उपलब्ध होईल.

- Advertisement -

अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी पुढाकार घेऊन सादर केलेल्या याबाबतच्या प्रस्तावास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली असून विभागाने यासंबंधीचा शासन निर्णय दि. 14 मे रोजीच निर्गमित केला आहे. ब्रेक द चेन अंतर्गत राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत या पार्श्वभूमीवर शिवभोजन थाळीच्या राज्याच्या प्रतिदिन संख्येतही दीडपट वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे गरीब आणि गरजूंना मोठा आधार मिळाला आहे.

राज्यातील करोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी ब्रेक द चेन प्रक्रिया संपूर्ण राज्यभर राबविली जात आहे. या काळात राज्यातील गोरगरीब जनतेचे हाल होऊ नयेत याची काळजी शासनाने घेतली आहे. राज्यात 15 एप्रिल 2021 पासून शिवभोजन योजने अंतर्गत नि:शुल्क थाळी उपलब्ध करून दिली जात आहे. 15 एप्रिल 2021 ते 20 मे 2021 पर्यंत 48 लाख 44 हजार 709 नागरिकांनी मोफत शिवभोजन थाळीचा लाभ घेतला आहे. या अडचणीच्या काळात मोफत शिवभोजन थाळीने राज्यातील गरीब जनतेला मोठा दिलासा दिला आहे. या योजनेचे मोठ्या प्रमाणात स्वागत होत आहे.

योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत 4 कोटी 27 लाख 81 हजार 306 थाळ्यांचे वितरण राज्यभरात झाले आहे. संपूर्ण राज्यात शिवभोजन योजनेअंतर्गत एकूण 950 केंद्र सुरू आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या