Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याउद्यापासून कडक निर्बंध : काय सुरु, काय बंद?

उद्यापासून कडक निर्बंध : काय सुरु, काय बंद?

मुंबई । प्रतिनिधी

करोनाचा वाढता संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी , बुधवारी रात्री आठ वाजल्यापासून राज्यात संचारबंदी लागू करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी केली. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना योग्य कारणाशिवाय घराबाहेर पडता येणार नाही. पुढील १५ दिवस म्हणजे १ मे पर्यंत ही संचारबंदी लागू असेल.

- Advertisement -

संचारबंदीच्या काळात किराणा, औषध, दुधविक्रीची दुकाने सुरू राहणार आहेत. संचारबंदीतून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना वगळण्यात आले आहे. सकाळी सात ते रात्री आठ या वेळेत रेल्वेसेवा, बस, रिक्षा, टॅक्सी आदी सार्वजनिक वाहतूक सुरू राहील. यातून केवळ अत्यावश्यक सेवेतील म्हणजे सफाई कामगार, आरोग्य, वैद्यकीय, पाणीपुरवठा, वीज, औषध बँकिंग, दूरसंचार, विमा, पेट्रोलियम, कार्गो,अधिस्वीकृतीधारक पत्रकार आदींना प्रवास करण्याची मुभा असेल.

राज्यात धडकलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे रोज विक्रमी संख्येने नागरिक बाधित होत आहेत. कोरोना रुग्णांचा रोजचा विक्रमी आकडा लक्षात घेऊन राज्य सरकारने निर्बंध अधिक कडक केले आहेत. उद्धव ठाकरे यांनी आज फेसबुक लाईव्हद्वारे नव्या निर्बंधांची घोषणा केली.

त्यानुसार पूर्वी ठरल्याप्रमाणे हॉटेल, रेस्टॉरंट पूर्णपणे बंद राहतील. त्यांना टेक अवे, पार्सल सेवा सुरू ठेवता येईल. शिवाय हॉटेलमधील कर्मचाऱ्यांचे लसीकरण करावे लागणार आहे. रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी सकाळी सात ते रात्री आठ या वेळेत ग्राहकांना पार्सलमधून खाद्यपदार्थांची विक्री करता येईल.

ज्या औद्योगिक वसाहतीत कामगारांना राहण्याची सुविधा आहे, अशा ठिकाणी उत्पादन सुरू ठेवता येईल. बांधकामाच्या ठिकाणी हेच बंधन लागू असेल, त्यांना कामगारांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले. पावसाळापूर्व सर्व कामे सुरू राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

निर्बंधाच्या काळात मदतीचा हात

अन्न सुरक्षा योजनेतून एक महिन्यासाठी प्रत्येकी तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ मोफत देणार. सात कोटी नागरिकांना होणार लाभ

पुढील महिनाभर शिवभोजन थाळी मोफत, रोज दोन लाख थाळ्या

विशेष साहाय्य योजनेतील ३५ लाख लाभार्थ्यांना दोन महिन्याचे प्रत्येकी एक हजार रुपये आगाऊ देणार

नोंदणीकृत इमारत कामगारांना प्रत्येकी १५०० रुपयांचे अर्थसाहाय्य, १२ लाख कामगारांना होणार लाभ

पाच लाख अधिकृत फेरीवाल्यांना प्रत्येकी १५०० रुपयांची मदत

परवानाधारक १२ लाख रिक्षाचालकांना एकवेळ १५०० रुपयांची मदत

खावटी योजनेचे लाभार्थी असलेल्या १२ लाख आदिवासी कुटुंबांना प्रत्येकी २ हजार रुपयांची मदत

कोरोना उपाययोजना आणि वैद्यकीय साहित्य, औषध खरेदीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना ३ हजार ३०० कोटीचा निधी

एकूण ५ हजार ४०० कोटी रुपयांचे मदतीचे पॅकेज

केंद्र सरकारकडे मागणी

प्राणवायूची हवाई वाहतूक करण्याची परवानगी द्या. पंतप्रधानांनी भारतीय वायू दलाला तसे आदेश द्यावेत

छोट्या आणि मध्यम उद्योजकांना जीएसटी परतावा दाखल करण्याची मुदत तीन महिने वाढवून द्यावी

करोनाचे संकट नैसर्गिक आपत्ती मानून वैयक्तिक लाभासाठी मदत करावी

‘नाईलाज म्हणून कडक निर्बंधांचा निर्णय घेतला आहे. यातून टीका झाली तरी त्याची पर्वा न करता जनतेशी असलेल्या बांधिलकीला जागून बंधने लादली आहेत. यात राजकारण न करता सर्वांनी सरकारला साथ द्यावी’ उद्धव ठाकरे- मुख्यमंत्री

- Advertisment -

ताज्या बातम्या