
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
शिवसेना (Shiv Sena) नेते खा.संजय राऊत (Sanjay Raut) नाशिक येथे एका कार्यक्रमासाठी आले असता, त्यांनी सध्याच्या सरकारच्या मनमानी कारभाराविरोधात टीका केली. प्रसारमाध्यमांशी बोलतांना राऊत म्हणाले की, जेव्हा सरकारला प्रश्न विचारले जातात पंतप्रधानांना प्रश्न उपस्थित केले जातात तेव्हा त्या ठिकाणांवर धाड टाकली जाते अथवा तुरुंगात टाकले जाते.
आज देशातील लोकशाही (Democracy) संकटात आलेली आहे. न्यायपालिका (Judiciary) प्रसारमाध्यमांचा (media) गळा घोटण्याचे काम सध्या सुरू केले आहे. देशात लोकशाही आहे की नाही? हा प्रश्न पडत आहे लोकांचे गळे दाबून तुरुंगात डांबून हे भाजप सरकार बेगडी स्वातंत्र्याच्या गप्पा मारत आहेत अशी टीका त्यांनी यावेळी केली.
शिवसेनेच्या न्यायालयीन लढाई बाबत बोलताना त्यांनी न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास असून बुधवारच्या सुनावणीबाबत काय होतं ते पहावं लागणार असल्याचे सांगितले. मात्र एकीकडे नारायण राणे (Narayan Rane) म्हणतात चिन्ह शिंदे गटालाच मिळणार आहे.
दूसरीकडे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणतात निर्णय आमच्या बाजूनेच येणार, त्यामुळे त्यांच्या बोलण्यातून सर्व यंत्रणा आमच्या खिशात असल्याचा अहंकाराचा दर्प येत आहे. मात्र आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास असून उद्या न्यायालयात काय ते स्पष्ट समजेलच असे खा. संजय राऊत यांनी सांगितले.