शिर्डी ते नागपूर समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा लवकरच खुला होणार

शिर्डी ते नागपूर समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा लवकरच खुला होणार
File Photo

मुंबई |प्रतिनिधी| Mumbai

हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी हा पहिला टप्पा लवकरच खुला होणार असल्याची माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी नागपूरमध्ये बोलताना दिली.

समृद्धी महामार्गाचे शिर्डी ते नागपूर हे पहिल्या टप्प्यातील काम आता जवळपास पूर्ण झाले असून फक्त रस्त्याच्या दुतर्फा उभ्या करायच्या सोयी सुविधा तसेच एक्झिट पॉईंट्सवर उभारण्यात येणारे टोलनाके उभारण्याचे कार्य प्रगतीपथावर आहे, असेही त्यांनी सांगितले.

एकनाथ शिंदे यांनी काल नागपूरमध्ये येऊन समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्यातील कामांची पाहणी केली. तसेच या महामार्गावर इलेक्ट्रिक कारचे सारथ्य करून त्यांनी फेरफटकाही मारला.

या महामार्गाचे काम अतिशय उत्तम झाले असून पहिल्या टप्प्यातील रस्ता बांधून तयार झाला आहे. समृद्धी महामार्गाच्या झिरो पॉईंटपाशी खास रोटरी सर्कल तयार करण्यात येणार असून त्यांचे काम देखील सुरू आहे. आज मंत्री शिंदे यांनी या रोटरी सर्कलच्या कामाचा आढावा घेतला. याच सर्कलच्या मध्यभागी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्याचे नियोजित आहे. सध्या या सर्कलचे काम प्रगतीपथावर असून ते देखील येत्या काही महिन्यात पूर्ण होईल, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.

या महामार्गाचे दुसरे मोठे वैशिष्ट्य म्हणजे वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी या महामार्गावर विशेष काळजी घेण्यात आली आहे. वन्यजीवांना एकीकडून दुसरीकडे जाताना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी समृद्धी महामार्गावर 8 ओव्हरपास आणि 76 अंडरपास तयार करण्यात आले आहेत. या ओव्हरपासच्या कामाची देखील एकनाथ शिंदे यांनी काल पाहणी केली. वन्यजीवांना आवाजाचा त्रास होऊ नये यासाठी नॉईस बॅरीयर्स देखील बसवण्यात येणार आहेत.

Related Stories

No stories found.