शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव माझाच!

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव माझाच!

मुंबई । वृत्तसंस्था

एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव मीच माझ्या पक्षाकडे मांडला होता. एकनाथ शिंदे एवढे मोठे पाऊल उचलत असताना अशा परिस्थितीत त्यांचे नेतृत्व असले पाहिजे. त्यांना मुख्यमंत्री केले पाहिजे. तसे झाल्यास त्यांच्या लोकांना ते आत्मविश्वास देतील, असे मी सांगितले आणि शिंदेंना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय झाला, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मागील वर्षीच्या सत्तानाट्यावेळी काय-काय घडले याची खळबळजनक माहिती एका खासगी वाहिनीच्या कार्यक्रमात उघड केली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलखुलास चर्चा करताना त्यांना विचारलेल्या प्रश्नांची रोखठोक उत्तरे दिली. सरकार बदलाबाबत एकनाथ शिंदे यांच्याशी माझे बोलणे झाले. हे सरकार बदलले पाहिजे, हे सरकार आपल्या विचाराने चालू शकत नाही, तेथे हिंदुत्ववाद्यांचा जीव गुदमरतोय यावर आमचे एकमत झाले. त्यानंतर मी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले पाहिजेत, असा विषय पक्षाकडे मांडला. पक्षाने माझा प्रस्ताव लगेच स्वीकारला नव्हता. माझ्या पक्षाला राजी करण्यासाठी मला बराच काळ द्यावा लागला, असेही फडणवीस म्हणाले.

एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव दिल्यानंतर मी सरकारमध्ये राहणार नाही, असे मी माझ्या पक्षाला स्पष्ट शब्दांत सांगितले होते. मी पक्षाचा प्रदेशाध्यक्ष होईल किंवा मला जी जबाबदारी द्याल ती घेईल. दोन वर्ष परिश्रम घेऊन पक्षाला क्रमांक एकचा पक्ष करतो, असे पक्षाला सांगितले. त्याप्रमाणे सर्व ठरले होते, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.

सरकार स्थापन करण्यासाठी आम्ही राज्यपालांना पत्र द्यायला गेलो, तेव्हा मी मुख्यमंत्री होणार नाही, शिंदे मुख्यमंत्री होणार आहेत हे मी चार लोकांना सांगितले होते. राज्यपालांकडे जाईपर्यंत मला, एकनाथ शिंदे आणि आमच्या तीन वरिष्ठांना ही गोष्ट माहीत होती. त्याशिवाय इतर कोणाला याबाबत काहीच माहीत नव्हते. राज्यपालांना पत्र दिल्यावर ते पत्र पाहून राज्यपालही चकित झाले. मी त्यांना सांगितले, असेच ठरले आहे. मी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री म्हणून शिंदे यांचे नाव जाहीर केले. तेव्हा माझ्या चेहर्‍यावर चिंता वा शोक दिसत नव्हता. माझा चेहरा विजयी होता. मला जिंकल्याचा आनंद होता, पण तो आनंद जास्त काळ टिकला नाही, असेही फडणवीस यांनी सांगितले.

पाच वर्ष आम्ही सरकार चालवले. अर्ध्या रात्री उद्धव ठाकरे यांनी फोन केला तरी त्यांच्या कोणत्याही कामाला मी कधीच नाही म्हटले नाही. त्यांना मान ठेवला. मुख्यमंत्री असूनही मी स्वत: 'मातोश्री'वर जायचो. कुठेही मानापमान नाट्य केले नाही. अनेकदा प्रोटोकॉलमध्ये पंतप्रधानांआधी मुख्यमंत्री बोलतो. मग इतर वक्ते बोलतात. मी प्रोटोकॉल तोडून माझ्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांना भाषण करायला द्यायचो. ठीक आहे. तुमचे नाही पटले. तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं होते, तुम्हाला दुसर्‍यासोबत जायचे होते तर मला हिंमतीने सांगायला हवे होते, अशा शब्दांत फडणवीस यांनी उद्धव ठाकरें यांच्यावर हल्ला चढवला.

तो माझ्यासाठी धक्का!

तुला उपमुख्यमंत्री व्हायचे आहे, असे माझ्या नेत्याने मला सांगितले. हा माझ्यासाठी मोठा धक्का होता. मुख्यमंत्री असताना उपमुख्यमंत्री होणार याचे मला दु:ख नव्हते. पक्षाने सांगितले तर मी चपराशी होईल, पण चिंता होती ती, हा सत्तेसाठी किती हपापला आहे, असे लोक म्हणतील याची! पण माझ्या नेत्यांनी जे नरेटिव्ह तयार केले त्यामुळे माझी उंची वाढली, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

तेव्हा पवारांना सोबत घ्यावे लागते

उद्धव ठाकरे तुमच्या पाठीत खंजीर खुपसतात, तेव्हा तुम्हाला अजित पवार यांना सोबत घेऊन शपथ घ्यावीच लागते. नाही तर उद्धव ठाकरेच यशस्वी होतात. पाठीतला खंजीरच यशस्वी होतो. त्यामुळे माझ्या पाठीतील खंजीर काढून मी ताठ उभा राहू शकतो. तुमचा मुकाबला करू शकतो. तुम्हाला घरी पाठवू शकतो, हे मला दाखवून द्यावे लागते, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com