शिंदे गटाचा लोकसभेसाठी इतक्या जागांवर दावा; आढावा बैठकीत खासदारांना कामाला लागण्याच्या दिल्या सुचना

शिंदे गटाचा लोकसभेसाठी इतक्या जागांवर दावा; आढावा बैठकीत खासदारांना कामाला लागण्याच्या दिल्या सुचना

मुंबई | Mumbai

लोकसभा निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक असताना शिवसेनेकडून निवडणुकीच्या तयारीला वेग आला आहे. शिवसेनेने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत लढवण्यात आलेल्या २२ जागांचा आढावा घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदारांच्या बोलावलेल्या बैठकीत हा आढावा घेण्यात आला आहे.

शिवसेनेचा राज्यातील ४८ पैकी २२ लोकसभा जागांवरचा दावा कायम असून सध्या सोबत असलेल्या विद्यमान १३ खासदारांना लोकसभा निवडणुकीच्या कामाला लागण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. लोकसभेसाठी शिंदे गटातील मंत्र्यांवर प्रत्येकी दोन ते तीन जिल्ह्यांची जबाबदारी दिली जाणार असल्याची माहिती आढावा बैठकीनंतर शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी दिली आहे.

यासोबतच, लोकसभेच्या निवडणुकीसाठी शिंदेगटाकडून जिल्हासंपर्क प्रमुख नेमले जाणार आहे. एखादी जागा बदलण्याची वेळ आल्यास वरिष्ठ पातळीवर निर्णय घेतला जाईल. शिवसेनेकडून २०१९ ला लढलेल्या २२ जागांचा या बैठकीत आढावा घेण्यात आला. सोबतच, शिवसेना पक्ष बांधणीसंदर्भात ही चर्चा झाली. या बैठकीला शिवसेनेच्या शिंदे गटाचे सर्व १३ खासदार उपस्थित होते,’ असे ही खासदार राहुल शेवाळे म्हणाले.

‘आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातील २२ ठिकाणी शिवसेनेचा महायुतीचा खासदार निवडून कसा येईल, यावर भर दिला जाणार आहे. विद्यमान १३ खासदारांचा निर्णय झाला, लोकसभा निवडणुकीसाठी आम्ही सज्ज आहोत. उर्वरित ठिकाणी उमेदवारीबाबत भाजप आणि राष्ट्रवादीसोबत चर्चा करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निर्णय घेतील,’ असे वक्तव्य राहुल शेवाळेंनी केले.

‘२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत २२ जागा शिवसेनेने लढवलेल्या आहेत, ज्या ठिकाणी युतीचे उमेदवार समोर आहेत, त्याबाबत वरिष्ठ पातळीवर मुख्यमंत्री निर्णय घेतील. विद्यमान १३ खासदारांच्या मतदारसंघात दौरे करणार, वेगवेगळ्या समन्वय समिती नेमण्यात आल्या आहेत. एक संपर्क प्रमुख म्हणून यादीही दिली जाईल.’ असे ही राहुल शेवाळे म्हणाले.

'देशदूत' / 'सार्वमत'चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com