
मुंबई | प्रतिनिधी Mumbai
पुढील वर्षी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज, बुधवारी रात्री त्यांच्या शिवसेना पक्षाच्या लोकसभा खासदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत लोकसभानिहाय मतदरासंघाचा आढावा घेतला जाणार असून निवडणूक तयारीच्या दृष्टीने चर्चा केली जाणार असल्याचे समजते.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील लोकसभा मतदारसंघांचा आढावा घ्यायला सुरूवात केली असून गेल्या आठवड्यात त्यांनी उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. या मतदारसंघातील विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर हे एकनाथ शिंदे यांच्या गटात गेले आहेत. मात्र त्यांचे चिरंजीव अमोल कीर्तिकर हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. त्यांनाच या मतदारसंघातून उमेदवारी देण्याबाबत उद्धव ठाकरे यांनी हिरवा कंदिल दिल्याचे समजते. मात्र, अमोल कीर्तिकर लोकसभा लढविण्यास इच्छुक नासल्यास त्यांच्याऐवजी आमदार सुनील प्रभू यांना मैदानात उतरविले जाऊ शकते. तर अमोल कीर्तिकर यांना दिंडोशी विधानसभेची उमेदवारी दिली जाऊ शकते.
या पार्श्वभूमीवर आता एकनाथ शिंदे यांनीही लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली असून त्याचाच एक भाग म्हणून खासदारांची बैठक बोलावल्याचे कळते. वर्षा बंगल्यावर रात्री आठ नंतर ही बैठक पार पडणार आहे.
शिवसेनेच्या लोकसभेतील १९ पैकी १३ खासदार मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेसोबत आहेत. साहजिकच या खासदारांच्या मतदारसंघात नेमकी काय परिस्थिती आहे हे या बैठकीत जाणून घेतले जाणार असल्याचे समजते. निवडणुकांना जेमतेम १० महिने उरले असल्याने आतापासूनच संबंधित उमेदवारांना हिरवा कंदिल दिल्यास त्यांना प्रचारासाठी पुरेसा वेळ मिळणार आहे. या खासदारांसमोर महाविकास आघाडीचा उमेदवार आल्यास अतीतटीची निवडणूक होणार असल्याने यासंदर्भातील रणनिती देखील या बैठकीत आखली जाणार असल्याचे सांगण्यात आले.