
मुंबई | Mumbai
महाराष्ट्राच्या (Maharashtra) राजकारणात कधी काय होईल याचा नेम नाही. २०१९ मध्ये राज्यात कॉंग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या तिन्ही पक्षांनी एकत्र येत महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) म्हणून सत्ता स्थापन केली. त्यानंतर अडीच वर्षांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेतून बंड करत भाजपसोबत हातमिळवणी करत सत्ता स्थापन केली. यानंतर शिवसेना दोन गटात विभागली गेली. त्यामुळे महाराष्ट्रात कधी काय घडेल याची प्रचिती सगळ्यांना आली. अशात आता राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे (MLA Eknath Khadse) यांनी शिंदे-फडणवीस सरकार कोसळू शकते असे विधान केले आहे...
यावेळी ते म्हणाले की, सध्या शिंदे-फडणवीस सरकारमध्ये (Shinde-Fadnavis Government) एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.अब्दुल सत्तार यांनी देखील उघडपणे याविषयी सांगितले आहे. त्यामुळे अब्दुल सत्तारांनी ते कार्यकर्ते कोण आहेत? हे उघडपणे सांगावे. अब्दुल सत्तारांनी षडयंत्र रचणाऱ्याचे नाव उघडपणे सांगावे, असे आवाहन खडसे यांनी केले आहे.
पुढे ते म्हणाले की, शिंदे-फडणवीस सरकारवर अजूनही न्यायालयाच्या (Court)निकालाची टांगती तलवार आहे. न्यायालय काय निकाल देईल त्याच्यावर या सरकारचे भवितव्य अवलंबून आहे. त्यात मंत्र्यांमध्ये अस्वस्थता आहे. ही अस्वस्थता जर वाढली तर सरकार कधीही कोसळू शकते असा दावा खडसे यांनी केला आहे.
दरम्यान, कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Minister Abdul Sattar) यांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत बोलतांना सांगितले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मी बाजू मांडली असून मला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु आहेत. तसेच आमच्याच पक्षातील मंत्रिपद न मिळालेल्या नेत्याचे माझ्याविरोधात षडयंत्र सुरु असून पक्षाच्या बैठकीतल्या काही बातम्या बाहेर येत आहे, असेही त्यांनी सांगितले.