निवारा शेडचा प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत

निवारा शेडचा प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत

नाशिक । प्रतिनिधी Nashik

राष्ट्रीय पंडित दीनदयाल उपाध्याय अंत्योदय योजनेअंतर्गत (National Pandit Deendayal Upadhyay Antyodaya Scheme) 2019 च्या फेब्रुवारी महिन्यात नाशिक शहरात एका खासगी संस्थेच्या मार्फत बेघरांचा सर्वेक्षण करण्यात आला होता. यामध्ये 894 बेघर सापडले होते. या सर्वेक्षणाच्या आधारे नाशिक महापालिकेने राज्य शासनाकडे चार नवीन निवारा शेड (Shelter shed) बांधण्यासाठी सुमारे 22 कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठवला होता. सुमारे चार महिने झाले तरी शासनाने मंजुरी दिली नाही, यामुळे महापालिकेचा हा प्रस्ताव शासनाच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.

शासनाने महापालिकेच्या प्रस्तावास मंजुरी दिल्यास शहरात चार नवीन निवारा शेड तयार होणार आहे. पूर्वीचे दोन निवारा शेड शहरात असून एकूण सहा निवारा शेड होणार आहे. शहरातील बेघरांना या निवारा शेडचा फायदा होणार आहे तसेच पावसाळ्यानंतर थंडीचे दिवस आल्यावर अशा निवार्‍याची खूप गरज लागते.

सध्या शहरातील गंगाघाट किनारी असलेल्या संत गाडगे महाराज आश्रम या ठिकाणी एक तसेच पंचवटी येथील इंद्रकुंड या ठिकाणी एक असे दोन निवारा शेड आहे. मात्र या ठिकाणी एक निवारा शेडमध्ये सुमारे शंभर लोक राहतात तर उर्वरितसाठी आणखीन निवारा शेडची गरज लक्षात घेऊन नाशिक महापालिकेच्या वतीने चार नवीन निवारा शेड बांधण्यात येणार आहे.

यामध्ये एक सातपूर येथील जुन्या शाळेमध्ये दुमजली निवारा शेड बांधण्यात येणार आहे, यामध्ये 102 बेघर राहणार आहे. त्याच प्रमाणे चेहेडी पंपिंग स्टेशनया ठिकाणी तीन मजली निवारा शेड बांधण्यात येणार आहे, या ठिकाणी 220 लोक राहतील अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. त्याप्रमाणे वडाळा गाव म्हाडा कॉलनीच्या शेजारी तीन मजली निवारा शेड होणार आहे. याठिकाणी 213 बेघर राहतील अशी व्यवस्था करण्यात येणार आहे तर पंचवटी तपोवन येथे सध्या चौथ्या निवारा शेडचे काम प्रगतिपथावर आहे. याठिकाणी 180 बेघर राहतील अशी व्यवस्था राहणार आहे.

महापालिकेच्या वतीने ठेकेदारामार्फत निवारा शेड मध्ये राहणार्‍या बेघरांना सर्व प्रकारची सुविधा देण्यात येते. यामध्ये सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण रात्रीचे जेवणसह त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी विशेष प्रशिक्षण देखील दिले जातात. जेणेकरून जे काही काम करू शकतात ते निवारा शेड मध्ये काही दिवस थांबून स्वतःच्या पायावर उभे राहिल्यास ते बाहेर जाऊन स्वतःचे काम करून स्वतःचा घर चालतील अशी व्यवस्था राहते. दरम्यान शहरातील चार नव्या निवारा शेड साठी शासनाकडे प्रस्ताव रवाना झाला असून शासन त्याला कधी मंजुरी देते याकडे लक्ष लागले आहे.

18 मार्च 2022 रोजी शासनाकडे डीपीआर पाठविण्यात आला आहे. शासनाकडून मंजुरी मिळताच शहरातील चारही ठिकाणी निवारा शेडचे काम सुरू होणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com