'त्या' व्हायरल व्हिडीओवर प्रकाश सुर्वेंनी सोडलं मौन, म्हणाले...

'त्या' व्हायरल व्हिडीओवर प्रकाश सुर्वेंनी सोडलं मौन, म्हणाले...

मुंबई | Mumbai

शिवसेनेच्या पदाधिकारी शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांच्या व्हायरल व्हिडीओमुळे सध्या राज्यातलं वातावरण तापलं आहे. म्हात्रे यांनी वारंवार माध्यमांसमोर येत आपली भूमिका मांडली. पण प्रकाश सुर्वे यांच्या मौनामुळे विविध चर्चांना उधाण आलं होतं. आता सुर्वे यांनी आपली बाजू मांडली आहे.

'मला बहिणीसमान असणाऱ्या माजी नगरसेविका सौ. शीतल म्हात्रे मला या कार्यक्रमाबाबत काही सांगत असतानाच्या व्हिडीओमध्ये चुकीचे गाणे घालून महिलांचा अपमान करण्याच्या विकृत मानसिकेतेमधून हा व्हिडीओ सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित केला गेला.' असं म्हणत प्रकाश सुर्वे यांनी देखील व्हायरल व्हिडीओ मॉर्फ असल्याचा दावा केला आहे.

पाहा प्रकाश सुर्वेंनी लिहिलेल्या पत्रात नेमकं काय म्हटलंय?

सध्या श्री. एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यापासून माझ्या मतदार संघात जोमाने सुरू असलेल्या विविध विकास कामांच्या धडाक्यामुले स्वत:च्या राजकीय जीवनात हताश झालेले विरोधक लोकोपयोगी कामे करण्याऐवजी लोकप्रल्पांच्या कामांपासून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळविण्याकरिता व्हिडीओ मॉर्फ करणे, चारित्रहननन करणे अशा विकृत गोष्टी करत आहेत. यामधून त्यांचे राजकीय नैराश्य दिसून येते, सर्वसामान्य लोकांना मात्र त्यांच्यासाठी 24 तास लोकांमध्ये राहून काम करणारे लोकप्रतिनिधी आवडतात आणि लोक त्यांच्यामागे उभे राहतात हा माझा अनुभव आहे.

दिनांक 11.03.2023 रोजी लोकप्रकल्पांच्या उद्घाटन सोहळ्यानंतर हजारो लोकांच्या गर्दीच्या उपस्थितीत मा. एकनाथ शिंदे साहेब यांची रॅली झाली. यावेळी प्रचंड गर्दीत आणि प्रचंड आवाजात मला बहिणीसमान असणाऱ्या माजी नगरसेविका सौ. शीतल म्हात्रे मला या कार्यक्रमाबाबत काही सांगत असतानाच्या व्हिडीओमध्ये चुकीचे गाणे घालून महिलांचा अपमान करण्याच्या विकृत मानसिकेतेमधून हा व्हिडीओ सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित केला गेला. अशाप्रकारचे कृत्य हे हा व्हिडीओ बनविणाऱ्यांची महिलांच्या प्रति असलेली ही मानसिकता दाखवून देते.

छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलांचा आदर आणि सन्मान करण्याची शिकवण उभ्या महाराष्ट्राला दिली आहे हीच शिकवण स्वर्गीय मा. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सर्व शिवसैनिकांना दिली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आम्ही हीच शिकवण अंगीकारली आहे.

या बनावट व्हीडिओ प्रकरणात मुंबई पोलिसांनी तडफेने कारवाई करत या षडयंत्राबाबत संशयितांना अटक केली आहे. त्यामुळे तपासातून याबाबतचे सत्य समोर येईलच. अशाप्रकारचे व्हिडीओ पसरवून लोकांचे लक्ष विचलीत करता येईल मात्र, लोकांचे मन जिंकण्याकरिता लोकांमध्ये राहून लोकांची कामे करीत राहवी लागतात विरोधक आमच्या कामांमधून लोकांची कामे करण्याची प्रेरणा घेतील असी मी अपेक्षा करतो. या सर्व प्रकारामुळे माझे कुटुंबीय आणि मला प्रचंड मानसिक त्रास झाला आहे. ज्या कुणी हा व्हीडिओ बनविला असेल त्यांना परमेश्वर सद्बुद्धी देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com