
जालना | Jalna
काल (दि.०१ सप्टेंबर) रोजी जालना जिल्ह्यातील (Jalna District) अंतवरली सराटी गावामध्ये (Antwarli Sarati Village) मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी गेल्या चार दिवसांपासून उपोषण (Hunger Strike) करत असलेल्या मराठा आंदोलकांवर पोलिसांनी (Police) लाठीचार्ज केल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे आंदोलकांनी (Protester) आक्रमक होत पोलिसांवर दगडफेक केली. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणवार जाळपोळ झाली.
तसेच यामध्ये काही आंदोलक आणि पोलीस देखील जखमी झाले. यानंतर आज दिवसभर या घटनेचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटतांना पाहायला मिळाले असून या घटनेच्या निषेधार्थ ठिकठिकाणी मराठा समाजाकडून (Maratha Community) आंदोलन केले गेले. तर दुसरीकडे या लाठीचार्जवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप करण्यात येत असून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे.
या घटनेनंतर आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जालना येथे जाऊन उपोषण करत असलेले आंदोलक व जखमी मराठा आंदोलकांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी जालन्यात पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर हल्लाबोल केला. तसेच शरद पवारांनी जालन्यातील घटना घडल्यानंतर ट्वीट करत निषेध देखील व्यक्त केला होता. त्यावेळी या ट्वीटमध्ये त्यांनी म्हटले होते की, महाराष्ट्रात सध्या फक्त आणि फक्त हुकूमशाही चालू आहे. राज्य सरकार आणि गृह खात्यावर राज्यात शांतता प्रस्थापित करण्याचे काम असते, परंतु गृहमंत्रालयातील प्रशासकांनी पोलिस बळाचा वापर करून मराठा आंदोलकांवर तीव्र लाठीचार्ज केला, असे शरद पवारांनी म्हटले होते. त्यानंतर यावर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पलटवार करत प्रत्युतर दिले होते.
यावेळी बोलताना ते म्हणाले होते की, राजकारण करु नका, वाहत्या गंगेत हात धुऊ नका, तुम्ही मराठ्यांसाठी काय केलं ते सांगा?, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, आम्ही सत्तेत असताना आरक्षणाचा निर्णय घेतला. आरक्षण हायकोर्टात टिकवता आले नाही, याचा दोष मला सहकाऱ्यांना देता येणार नाही. आमची भूमिका तेव्हा स्पष्ट झाली होती. फडणवीसांनी २८ वर्षा पूर्वीची गोवारी घटना सांगितली. ते म्हणाले मी मुख्यमंत्री असताना नागपूरला आदिवासी समाजाचे आंदोलन झाले होते. गोवारी आंदोलन झाले त्यावेळी चेंगराचेंगरीत काही लोकांचा जीव गेला. त्यावेळी राजीनामा का दिला नाही, असे फडणवीस म्हणाले होते.
यावर बोलतांना शरद पवार म्हणाले की, यामध्ये दोन गोष्टी आहे. ज्यावेळी गोवारी आंदोलन झाले त्यावेळी मी नागपुरात नाही तर मुंबईत होतो. दुसरी गोष्टी माझ्या मंत्रिमंडळातील आदिवासी कल्याणमंत्री मधुकर पिचड यांनी राजीनामा दिला होता. त्यांनी राजीनामा दिला कारण हा आदिवासी समाजाशी सबंधित प्रश्न होता. नैतिक जबाबदारी स्विकारुन पिचडांनी राजीनामा दिला. तो राजीनामा आम्ही स्विकारला होता. ज्यांनी (देवेंद्र फडणवीस) मला प्रश्न विचारला त्यांच्याकडे गृहखात्याची नैतिक जबाबदारी आहे. फडणवीसांनी गोवारी आणि पिचडांच्या काळातील सरकारच्या धोरणांचे स्मरण करावे. त्यांना स्वत:ला प्रशासन कसे चालवावे याचे उदाहरण मिळेल, असे शरद पवार म्हणाले. तसेच एवढं मोठं प्रकरण झाले त्याचे पडसाद राज्यात उमटत आहेत. याची जबाबदारी घ्यायची असते, असा टोला शरद पवार यांनी फडणवीसांना लगावला आहे.