शरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री ठाकरेंची भेट; आघाडी सरकार टिकवण्यासाठी प्रयत्न

jalgaon-digital
2 Min Read

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांच्या बंडाच्या धक्क्यानंतर शिवसेना आणि महाविकास आघाडीचे ( Mahavikas Aaghadi ) घटक पक्ष आता हळूहळू सावरायला लागले आहेत. आघाडी सरकार वाचविण्यासाठी आता प्रयत्न सुर झाले असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा त्यासाठी पुढाकार घेतला आहे. पवार यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची त्यांच्या मातोश्री या निवासस्थानी भेट घेतली. तब्बल दोन तास चाललेल्या या बैठकीत आघाडी सरकार टिकविण्यासाठी कोणते पर्याय उपलब्ध आहेत. विधिमंडळात तसेच न्यायालयात लढाई कशी लढायची यावर चर्चा झाल्याचे समजते.

एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या नंतर शिवसेना आणि आघाडीला मोठा धक्का बसला आहे. उद्धव ठाकरे यांनी तर मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची तयारी केली होती. मात्र आघाडीतील तसेच शिवसेनेतील नेत्यांनी त्यांचे मन वळविले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रसने विश्वास दाखविल्यानंतर आता आघाडी सरकार कसे वाचविता येईल याद़ष्टीने जोमाने प्रयत्न सुरू झाले आहेत.

या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीला महत्व आले आहे. शिवसेनेने एका बाजूला आमदारांना अपात्र ठरविण्यासाठीची प्रक्रिया सुरू केली आहे. बंडखोर १६ आमदारांना अपात्र ठरविण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. एकनाथ शिंदे गटावर दबाव टाकण्याची ही रणनिती आहे.या प्रक्रियेला वेळ लागणार आहे. जस जसे दिवस जातील तस तसे शिंदे गटात अस्वस्थता वाढेल हा या मागचा हेतू आहे.

या दरम्यानच शिंदे गटातील काही आमदारांना जर परत बोलाविण्यात शिवसेना नेत़त्वाला यश मिळाले तर शिंदे गटावरील दबाव आणखीन वाढू शकतो.राजकीय शह-काटशहाची लढाई संपल्यानंतर कायदेशीर लढाई कशी लढायची याबाबत आजच्या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते. या बैठकीला राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *