
मुंबई | प्रतिनिधी | Mumbai
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वाखालील गटाने भाजपशी (BJP) संधान साधत राज्य सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याने शरद पवार (Sharad Pawar) यांच्या गटाला गळती लागली आहे. ही गळती रोखून पक्षाला उभारी देण्यासाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP Congress) राज्यात एकनिष्ठतेची मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेमुळे कार्यकर्त्यांचा शरद पवार यांच्यावर असलेला विश्वास स्पष्ट होणार आहे.
या मोहिमेत सहभागी होण्यासाठी सदस्याला ७०३०१२००१२ या मोबाईल क्रमांकावर मिस्ड कॉल द्यायचा आहे. हा मिस्ड कॉल दिल्यानंतर सदस्याला त्याच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएसद्वारे एक लिंक प्राप्त होईल. या लिंकच्या माध्यमातून सदस्याला स्वतःची वैयक्तिक माहिती नोंदवायची आहे. माहिती नोंदवल्यानंतर सदर सदस्याची नोंद होऊन सदस्याचे अधिकृत डिजीटल कार्ड डाऊनलोड होईल. अशी ही एकनिष्ठतेची मोहीम गाव पातळीपासून ते राज्य पातळीपर्यंत अधिक प्रभावीपणे राबवण्यात येत आहे, अशी माहिती शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी सोमवारी दिली.
गेल्या काही महिन्यांमध्ये लाचार होऊन केंद्रीय तपास यंत्रणांच्या चौकशांना घाबरून पक्षातील काही जणांनी सत्तेसोबत जाण्याची भूमिका स्वीकारली. पक्षविरोधी भूमिका घेतलेल्या व्यक्तींचे पक्ष समर्थन करत नाही. पुरोगामी विचारांना बगल देत सत्तेसाठी लाचार झालेल्यांना महाराष्ट्रातील जनता चांगलाच धडा शिकवेल. कारण महाराष्ट्राची (Maharashtra) जनता ही भित्र्या राज्यकर्त्यांसोबत नाही तर समग्र महाराष्ट्राच्या विकासाचा विचार करणाऱ्या निधड्या छातीने सह्याद्रीसारख्या लढणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या दूरगामी विचारांना साथ देणारी आहे. जनतेच्या या विश्वासाला अधिक ताकद देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ही मोहीम राबविण्यात येत असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.