
मुंबई | Mumbai
अजित पवारांनी (Ajit Pawar) केलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीत (NCP) मोठी फुट पडली असून राज्याच्या राजकरणात मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या आहेत. या फुटीनंतर राष्ट्रवादीत दोन गट पडले असून आज शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांच्या मुंबईत बैठका पार पडत आहेत. या बैठकीत दोन्ही गटाच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले...
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्यांच्या गटातील कार्यकर्त्यांना मुंबईतील एमईटी कॉलेज येथे संबोधित करतांना शरद पवारांवर जोरदार निशाणा साधला. त्यानंतर शरद पवारांनी वाय.बी. चव्हाण सेंटर येथे झालेल्या बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना अजित पवार गटाने केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिले.
यावेळी शरद पवार म्हणाले की, आज अनेकांनी वेगळी भूमिका घेतली, त्याबद्दल माझे काही मत नाही, पण राष्ट्रवादीच्या ज्या कार्यकर्त्यांनी निवडून दिले त्यांना विश्वासात न घेता वेगळी भूमिका घेतली गेली. अनेक जण चिन्ह आमचा आहे असे सांगतात. पण काळजी करू नका, चिन्ह जाणार नाही आणि जाऊ देणारही, अशा शब्दांत शरद पवारांनी अजित पवार गटाला सुनावत थेट त्यांच्याविरुद्ध दंड थोपटल्याचे पाहायला मिळाले.
पुढे ते म्हणाले की, जे माझा फोटो लावतात, त्यांना माहिती आहे की आपलं नाणं चालणार नाही. तसेच मला पांडूरंग म्हणायचं आणि आमच्याकडे दुर्लक्ष केले गेले असे सांगायचे असा कार्यक्रम काहींनी सुरू केल्याचे शरद पवारांनी म्हटले. तसेच राष्ट्रवादीच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले मात्र मग त्यांना मंत्रिमंडळामध्ये कसे घेतले? जो राजकीय विचार आपल्याला मान्य नाही, त्या विचाराच्या पंक्तीला जावून बसणं योग्य नाही. काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली असेल तर माझी काहीही तक्रार नाही, असेही पवार म्हणाले.
तसेच केंद्र सरकारमध्ये मी अनेकदा काम केले आहे. आज देशात ज्यांच्या हातात सत्ता आहे, त्यांच्यामध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. देशातील विरोधक एकत्र येत आहेत. विरोधकांच्या बैठकांमध्ये देशहितासंबंधी चर्चा होत आहेत. पंतप्रधानांनी बारामतीमध्ये सांगितले, होते की देश कसा चालवायचा हे मी पवार साहेबांचे बोट धरुन शिकलो आणि नंतर ते बदलले. देशाचे नेते असलेले लोक पक्षाचेही नेते आहेत. परंतु बोलतांना त्यांच्याकडून सभ्यता पाळली जात नाही. देशात संवाद राहिलेला नसल्याचे यावेळी शरद पवारांनी म्हटले.