
मुंबई | Mumbai
सध्या राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) केंद्रस्थानी आहेत. एकीकडे शरद पवारांनी पक्षाध्यक्षपद सोडल्याचा निर्णय घेतल्याने महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले असतानाच दुसरीकडे देशात मणिपूरमध्ये हिंसाचार (Manipur) उफाळल्याने तिथे दहशतीचे वातावरण आहे. अशातच आता राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी माणूसकीचे दर्शन घडवून दिल्याचा एक किस्सा समोर आला आहे...
मणिपूरमध्ये अडकलेल्या मुलांच्या पालकांनी गोविंद बागेत जाऊन शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर शरद पवार यांना सर्व पालकांनी संबधित घटनेची माहिती दिली. यानंतर शरद पवार यांनी मणिपूर सरकारशी बोलून मुलांना सुरक्षा पुरवली जावी अशी विनंती केली. पवार यांच्या फोननंतर पालकांनी सुटकेचा निश्वास सोडला.
मणिपूरमध्ये सध्या मोठा हिंसाचार सुरू असून ज्यामध्ये सांगली जिल्ह्यातील जतमधील काही विद्यार्थी अडकले होते. संबंधित विद्यार्थ्यांच्या वडीलांनी ओळखीतून बारामतीच्या शेतकऱ्यांकडे मदतीची याचना केली. याबाबत सचिव प्रल्हाद वरे यांना सांगलीमधून संभाजी कोडग यांचा फोन आला. त्यानंतर कोडग यांच्या मुलाने वडिलांना फोन करून मणिपूरमधील परिस्थिती सांगत आम्हाला येथून वाचवा, आजुबाजुला गोळीबार आणि स्फोटाचे आवाज येत आहेत. कदाचित हा माझा शेवटचा फोन असेल, काहीतरी करा अशी विनवणी केली.
त्यावर वरे यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकडे जाऊ, असे सांगत मानसिक आधार देण्याचा प्रयत्न केला. परंतु कोडग यांनी, एवढा पण वेळ नाही कधीही होस्टेलवर हल्ला होऊ शकतो अशी भीती व्यक्त केली. त्यानंतर वरे यांनी त्यांना शरद पवार यांचे स्वीय सहायक राऊत यांचा मोबाईल क्रमांक दिला. कोडग यांनी तातडीने राऊत यांना संबंधित मुलांना आलेली अडचण सांगितली.
यानंतर रात्री बाराच्या सुमारास मणिपूर मिल्र्टीच्या चिफ कमांडरांचा संभाजी कोडग यांचा मुलगा मयुर कोडग या विद्यार्थ्याला फोन आला आणि आमची टीम तुम्हाला सुरक्षित स्थळी पोहचवण्यासाठी थोड्याच वेळात हॉस्टेलवर येत आहे असा निरोप दिला .त्या रात्रीतच या १२ मुलांना लष्करी छावणीमध्ये सुरक्षितरीत्या स्थलांतरीत करण्यात आले. त्यामुळे शरद पवार यांनी एकीकडे पक्षाच्या अध्यक्षपदापासून दूर होण्यचा जाहीर करत असताना दुसरीकडे मात्र सर्वसामान्य लोकांची कामे सुरू ठेवलेली दिसत आहेत.
मणिपूरमध्ये आयाआटीचं शिक्षण घेण्यासाठी महाराष्ट्रातून काही विद्यार्थी गेले आहेत. मात्र मणिपूरमध्ये सुरू झालेल्या हिंसाचारानंतर ते विद्यार्थी तिथेच अडकून पडले आहेत. त्यांच्या पालकांनी शरद पवार यांची भेट घेतली. इतर राज्यातील सरकारने मणिपूरमधून त्यांचे विद्यार्थी सुरक्षित परत आणले, मात्र महाराष्ट्र सरकारकडून दिरंगाई होत असल्याचा आरोप पालकांनी केला. त्यांनंतर शरद पवार यांनी मणिपूर सरकारला फोन करून विद्यार्थ्यांना सुरक्षा पुरवण्यास सांगितले.
दरम्यान, सद्यस्थितीत मणिपूरमधील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी १० हजार जवान उतरविण्यात आले असून मणिपुर हिंसाचारात आत्तापर्यंत ५४ जणांचा बळी गेला आहे. या ५४ मृतांपैकी १६ जणांचे मृतदेह चुराचंदपूर जिल्हा रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आले आहेत, तर १५ मृतदेह जवाहरलाल नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस इम्फाळ पूर्व येथे ठेवण्यात आल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे.