शहापूरला भावलीतून पाणी नाहीच- विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ

शहापूरला भावलीतून पाणी नाहीच- विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ

इगतपुरी । प्रतिनिधी Igatpuri

इगतपुरी ( Igatpuri ) तालुक्याची जलवाहिनी भावली धरणासाठी ( Bhavli Dam ) तालुक्यातील बांधवांनी मोठा त्याग केला आहे. त्यांचे हक्काचे पाणी शहापूरला जाऊच देणार नाही,असा खणखणीत इशारा विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Assembly Vice President Narhari Jhirwal ) यांनी दिला. भावली धरण भरल्याने त्याच्या जलपूजनाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंंगी आ. झिरवाळ उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते.

तालुक्यातील भावली धरण चार दिवसांपूर्वी ओव्हरफ्लो झाले होते. त्याची पाहणी करण्यासाठी आज विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ व आमदार हिरामण खोसकर ( MLA Hiraman Khoskar ) यांंच्यासह स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.

झिरवाळ ते पुढे म्हणाले की, गतवर्षी भावली येथील पर्यटन विकासासाठी पाच कोटी रुपये मंजूर झाले असून करोना महामारीत राज्य सरकारला अडचणी आल्या आहेत. त्यामुळे तो निधी आगामी काळात आमदार हिरामण खोसकर हे पाठपुरावा करून येथे विकासकामे करतील.

यावेळी मनोगत व्यक्त करताना आमदार खोसकर म्हणाले की, भावली धरण परिसरातील नयनरम्य दृश्य, कोसळणारे धबधबे, धुक्याची चादर, ढगांचे कडे व कोसळणारा पाऊस हा येथील निसर्गरम्य परिसर आहे. यामुळे इथे पर्यटन विकसित करण्यासाठी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन निधी आणण्यासाठी प्रयत्नशील राहील. धरणातील पाण्याचे शेती व पिण्याच्या पाण्याला प्राधान्य दिले जाईल अशी ग्वाही आमदार खोसकर यांनी यावेळी दिली.

यावेळी काँग्रेसचे संदीप गुळवे, माजी आमदार शिवराम झोले, माजी जि.प.सदस्य गोरख बोडके, जनार्दन माळी, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लहाणे, रामदास धांडे, बाळासाहेब गाढवे, अनिता घारे, भरत आराटे, किरण मुसळे, हरिश्चंद्र चव्हाण, पिके ग्रुपचे अध्यक्ष प्रशांत कडू, भाऊराव भागडे, पोपटराव भागडे, अरुण गायकर, कैलास घारे, वसीम सैयद, महेश शिरोळे, नारायण वळकंदे यांच्यासह जलसंपदा विभागाच्या अधीक्षक अभियंता अलका अहिरराव, कार्यकारी अभियंता सागर शिंदे आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.