नाशिकसाठी सात हजार रेमडेसिवीर

मायलन कडून विशेष विमानाने आज पुरवठा
नाशिकसाठी सात हजार रेमडेसिवीर

देवळाली कॅम्प । वार्ताहर

नाशिक शहरासह संपूर्ण जिल्हाभरात करोना संसर्ग आजाराने थैमान घातले आहे. यावर मात करण्यासाठी रेमडेसिविर इंजेक्शन परिणामकारक ठरत असल्यामुळे या इंजेक्शनचा पुरवठा वाढविण्यासाठी मायलन कंपनी प्रशासनाकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. आज बुधवारी नाशिकरांसाठी सात हजार रेमडेसिवीरचा साठा उपलब्ध होणार असून बंगलोरहून एका विशेष विमानाने हा इंजेक्शनचा साठा मुंबईमार्गे नाशिकला येणार असल्याची माहितीखासदार हेमंत गोडसे यांनी दिली.

गेल्या चार दिवसांपूर्वी काही इंजेक्शन पुरवठाधारकांच्या शिष्टमंडळाने खासदार गोडसे यांची भेट घेत मायलन कंपनीकडून पुरेसा इंजेक्शन साठा उपलब्ध व्हावा यासाठी साकडे घातले होते. दरम्यान, मायलन कंपनीने दहा हजार रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा जिल्हावासियांसाठी उपलब्ध करुन द्यावा, यासाठी खा. गोडसे यांनी मायलन कंपनी प्रशासनाकडे पाठपुरावा सुरु केला होता. सोमवारी देखील खा. गोडसे यांनी कंपनीचे नरेश हसीजा यांच्याशी संपर्क साधत तातडीने नाशिक जिल्हावासियांसाठी इंजेक्शन उपलब्ध करुन देण्याची गळ घातली.

पोटतिडकीने मांडलेली भूमिका मायलन कंपनी प्रशासनाला भावल्याने त्यांनी आज मंगळवारी पाच हजार रेमडेसिवीर साठा पाठवत असल्याची माहिती खा. गोडसे यांना दिली. नाशिक शहरासह जिल्ह्याची वाढती करोना बाधितांची रुग्णसंख्या लक्षात घेता पाच हजार इंजेक्शनच्या साठ्यावर यावर खा. गोडसे यांचे समाधान न झाल्याने त्यांनी अधिकचा इंजेक्शनचा साठा उपलब्ध करुन देण्याची आग्रही मागणी केली.

कंपनीने त्यांच्या मागणीचा पुन्हा गांभीर्याने विचार करुन नाशिक जिल्हावासियांसाठी सात हजार रेमडेसिवीर उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी सकाळी हा इंजेक्शनचा साठा बंगलोर येथून एका विशेष विमानाने मुंबईत येणार असून त्यानंतर बायरोड नाशिक शहरातील अधिकृत वितरकांपर्यंन्त पोहचणार आहे. त्यात गेट वेल 2000 हजार, लाईफ लाईन फार्मा 1500, दि विजय 1500, पी.एस. फार्मा 1000 हजार असा रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा शहरातील अधिकृत एजन्सींना होणार आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com