सात महिन्याच्या प्रगतीची करोनाशी यशस्वी झुंज
नाशिक

सात महिन्याच्या प्रगतीची करोनाशी यशस्वी झुंज

आई, दोघा भावंडांसह केली घरवापसी

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

मालेगाव । प्रतिनिधी

करोनाने जखडले तरी न डगमगता त्याचा यशस्वी मुकाबला करत अवघ्या दहा दिवसात करोनावर मात करणार्‍या अवघ्या सात महिन्याच्या ‘प्रगती’सह तिची आई व दोन भावंडांनी फुलांच्या वर्षावात यशस्वी घरवापसी केली. महानगरपालिका आरोग्य विभागाने गत दहा दिवसात कुटूंबातील सदस्यांप्रमाणे काळजी घेत पाचही जणांना संकटातून बाहेर काढल्याबद्दल प्रगतीच्या आईने डोळ्यात आनंदाश्रू आणत कृतज्ञता व्यक्त केली.

कॅम्प भागातील शिवाजीवाडी परिसरातील गरीब कुटूंबातील सात महिन्याच्या प्रगतीसह तिची आई, दोन वर्षाचा भाऊ व चार वर्षाच्या बहिण करोनाने बाधित झाल्याने त्यांना 20 जूनरोजी मसगा महाविद्यालयातील करोना उपचार केंद्रात दाखल करण्यात आले होते.

सात महिन्याच्या बालिकेस श्वसनाचा त्रास जाणवत असल्याने तिची प्रकृती खालावली होती. ऑक्सिजन, सॅच्युरेशन अवघे 58 इतके असल्याने बालरोगतज्ञ डॉ. पुष्कर आहेर व त्यांचे वैद्यकिय पथक दिवसरात्र बालिकेसह इतर बाळांवर लक्ष ठेवून होते.

मनपा आयुक्त त्र्यंबक कासार यांनी देखील बालकांच्या उपचाराबाबत विशेष काळजी घेण्याचे निर्देश दिले होते. उपायुक्त नितीन कापडणीस, आरोग्याधिकारी डॉ. सपना ठाकरे हे सातत्याने भेट देवून आरोग्य सेवेवर लक्ष ठेवून होते.

आरोग्य विभागातील वैद्यकिय अधिकारी व सेवकांनी दहा दिवस घेतलेल्या परिश्रमास यश आले. प्रगतीसह तिचे भावंडं व आईने देखील औषधोपचार योग्य प्रतिसाद दिल्याने त्यांच्यात कोणतेही लक्षण दिसून येत नसल्याने आज चौघांना फुलांच्या वर्षावात घरी सोडण्यात आले.

मनपा प्रशासन व वैद्यकिय पथकाने घेतलेल्या काळजीबद्दल सदर मातेने हात जोडून कृतज्ञता व्यक्त केली. उपायुक्त नितीन कापडणीस, आरोग्याधिकारी सपना ठाकरे, उपचार केंद्र नोडल अधिकारी डॉ. पुष्कर अहिरे, डॉ. संदीप खैरनार, डॉ. स्वप्निल खैरनार, जनसंपर्क अधिकारी दत्तात्रेय काथेपुरी, सुवर्णा कुमावत, विनया भालेकर, भरत देवरे, महेश सोनवणे, तुषार पाटील, जिजा सोनवणे, एलीना मायकल, संदीप काळुंखे, फुरखान पठाण, आरीफ साबीर, एजाज आदी वैद्यकिय अधिकारी, सेवक उपस्थित होते.

मनपा प्रशासनाच्या नियोजनबध्द कार्यक्रमानुसार आरोग्य विभागाव्दारे करोना बाधितांवर योग्यरित्या उपचार सुरू असल्याने करोनामुक्त रूग्णांची संख्या वाढली आहे. सात महिन्याच्या बालिकेची प्रकृती गंभीर होती. मात्र वैद्यकिय अधिकार्‍यांनी दिवसरात्र परिश्रम घेत तिची काळजी घेतली. करोनामुक्त होवून संपुर्ण कुटूंब घरवापसी करत आहे. हा क्षण निश्चितच मनाला आनंद देणारा आहे.
नितीन कापडणीस उपायुक्त, मनपा
Deshdoot
www.deshdoot.com